Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 

महत्त्वाच्या ऍक्‍सेसरीज
सतीश पाकणीकर
Monday, April 10, 2017 AT 12:00 AM (IST)


महत्त्वाच्या ऍक्‍सेसरीज

उत्तम कॅमेरा गळ्यात आला. त्याच्यावर तितक्‍याच उत्तम दर्जाची लेन्सही बसवली आणि आपण आपल्यासमोर दिसणारे, डोळ्यांना भावलेले व मनात उतरलेले प्रकाशचित्र घेण्यास तयार! जवळपास सर्वच कॅमेरा कंपन्या त्यांच्या कॅमेऱ्यांत असलेल्या आधुनिक सोयींची गुणवर्णने करण्यात व ग्राहकाला आकर्षून घेण्यात पटाईत असतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बिल्ट-इन फ्लॅश, झूम लेन्स, ऑटो मोड या व इतर बऱ्याच सोयी असतातही कॅमेऱ्यांमध्ये; पण कधी कधी इतर काही उपकरणे (ऍक्‍सेसरीज) प्रकाशचित्र घेण्यासाठी आवश्‍यक बनतात. अशी काही उपकरणे आपल्याजवळ असणे महत्त्वाचे ठरते.
या छोट्या छोट्या, पण महत्त्वाच्या ऍक्‍सेसरीज कोणत्या?
1. लेन्स हूड - कित्येक वेळी सूर्यप्रकाशात आपल्या डोळ्यांवर उन्हाची तिरीप आल्यामुळे आपण आपला हात डोळ्यांवर आडवा धरल्याचे आपल्याला आठवत असेल. जी अवस्था डोळ्यांची तीच अवस्था लेन्सचीही असते. फोटो टिपत असताना प्रकाश समोरून आल्यास अथवा कोणत्याही चकाकणाऱ्या पृष्ठभागावरून परावर्तित होऊन लेन्सवर पडल्यास त्याचा परिणाम "ग्लेयर'च्या रूपात प्रकाशचित्रात दिसतो. परिणामी प्रकाशचित्राचा दर्जा खालावतो. अशावेळी लेन्स हूड उपयोगी पडते. असा अनावश्‍यक प्रकाश "हूड'ने अडवल्यामुळे प्रकाशचित्राच्या दर्जावर परिणाम होत नाही.
2. स्काय लाइट अथवा यू व्ही फिल्टर - आपण जेव्हा डीएसएलआर कॅमेरा खरेदी करतो, त्या वेळीच खरेदी करण्याची अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फिल्टर. प्रकाशकिरणांचा एक भाग असलेली अल्ट्रा व्हायोलेट किरणे अडवण्यासाठी असलेला हा फिल्टर फक्त एवढेच काम करतो असे नाही, तर त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे लेन्सच्या पुढील भागाचे, त्यावरच्या कोटिंगचे संरक्षण करण्याचे कामही करतो. कधी कधी अपघाताने आपल्या बोटांचा ठसा लेन्सच्या पुढील भागावर उमटण्याची शक्‍यता असते. हवेतून उडून येणारी धूळ, कचरा हेही लेन्सच्या भागावर हानी पोचवू शकतात; पण आपण जर लेन्सवर हा फिल्टर बसवलेला असेल, तर या शक्‍यतांपासून आपली सुटका होते. याच्या सोबतीनेच इतरही काही फिल्टर्स उपलब्ध असतात. कलर करेक्‍शन, पोलरायझर, स्पेशल इफेक्‍ट फिल्टर असे फिल्टर्स वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोगी पडतात.
3. ट्रायपॉड किंवा मोनोपॉड - कधी कधी उपलब्ध प्रकाश कमी असतो किंवा कॅमेऱ्यावर जास्त फोकल लेन्थची (नाभीय अंतर) लेन्स बसवलेली असल्याने दृश्‍यकोन कमी असतो. त्या वेळी कॅमेऱ्याची कळ दाबताना कॅमेरा हलू शकतो. अशावेळी जर कॅमेरा ट्रायपॉड (तिपाई) किंवा मोनोपॉडवर बसवला, तर कॅमेरा हलण्याची शक्‍यता नाहीशी होते. कॅमेराबॅगमध्ये मावणाऱ्या छोट्या ट्रायपॉडपासून ते व्यावसायिक उपयोगाच्या मोठ्या ट्रायपॉडपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध असतात. हल्ली कार्बनपासून बनवलेले उत्तम दर्जाचे, मजबूत पण वजनाला कमी असलेले ट्रायपॉड वापरण्याकडे प्रकाशचित्रकारांचा कल असतो. अर्थातच ते खिशाला परवडणारेही हवे; पण वजनाला हलके असल्याने बरोबर घेऊन जाणेही सुकर होते. अशा ट्रायपॉडवरील जे "हेड' असते (म्हणजे कॅमेरा ज्याच्यावर बसवला जातो) तेही महत्त्वाचे असते. जर ते "पॅन टिल्ट हेड' असेल, तर मग ती सुविधा जास्त उपयोगी ठरते. कॅमेरा क्षितिज-समांतर रेषेत हलवण्याला "पॅनिंग' असे म्हणतात. तर उभ्या रेषेत हलवण्याला "टिल्टिंग' असे म्हणतात. काही व्यक्तींना मात्र मर्यादित सोयी असलेला मोनोपॉड बाळगणे व त्याचा वापर करणे जास्त आवडते.
4. केबल रिलीज - कॅमेऱ्यात जास्त वेळाचा शटर स्पीड वापरताना शटरच्या हालचालीमुळेही कधी कधी प्रकाशचित्र हललेले येऊ शकते. त्यासाठी केबल रिलीजचा वापर योग्य ठरतो. ही केबल कॅमेऱ्याच्या "क्‍लिक'च्या बटनावर बसवावी लागते. यामध्ये प्रत्यक्ष कॅमेऱ्याला हातही न लावता इन्फ्रा रेड सिग्नलद्वारे दुरून वापरता येणारे केबल रिलीजसुद्धा उपलब्ध असतात.
5. एक्‍स्पोजर मीटर - आजकाल सर्वच कॅमेऱ्यांमध्ये स्वतःचे एक्‍स्पोजर मीटर असतो. उपलब्ध प्रकाशाचा वापर करून फोटो घेण्यासाठी त्याचा उत्तम वापरही होतो; पण जर आपण बाहेरून मोठे फ्लॅश लाइट वापरून फोटो घेणार असलो, तर मात्र त्या फ्लॅश लाइटची तीव्रता मोजण्यासाठी कॅमेऱ्यातील एक्‍स्पोजर मीटरचा उपयोग नसतो. त्यासाठी आपल्याला फ्लॅश मीटरची आवश्‍यकता भासते. अद्ययावत एक्‍स्पोजर मीटरमध्ये उपलब्ध प्रकाशाबरोबरच फ्लॅशची तीव्रता अचूकतेने मोजण्याची सोय असते. (फिल्म शूटिंगच्या वेळीही प्रकाशाचे अचूक मोजमाप करण्यासाठी असे एक्‍स्पोजर मीटर वापरताना आपल्याला बघायला मिळते.) या एक्‍स्पोजर मीटरने वस्तूवर पडणारा प्रत्यक्ष प्रकाशही मोजता येतो, तसेच वस्तूवरून परावर्तित होऊन येणारा प्रकाशही मोजता येतो. प्रकाशाचे अचूक मोजमाप झाल्याने त्याचा विरोधाभास, पोत व रंग यांची उत्तम सांगड घालून नयनरम्य प्रकाशचित्र टिपणे प्रत्येक प्रकाशचित्रकाराला आव्हानात्मक असते.
6. फ्लॅशगन - डीएसएलआर कॅमेऱ्यातील जवळ जवळ सर्व हाफ फ्रेम कॅमेऱ्यांवर छोटीशी फ्लॅशगन असते. उपलब्ध प्रकाश कमी असेल व कॅमेरा ऑटोमोड वर असेल, तर ही छोटीशी फ्लॅशगन आपोआप उघडून प्रकाशचित्र घेतले जाते. कॅमेऱ्यापासून सुमारे दहा फुटांपर्यंतच्या गोष्टी त्यामुळे प्रकाशित होऊ शकतात. त्यापुढील अंतरावरील घटक प्रकाशमय करण्यासाठी मग कॅमेऱ्यावर वेगळी फ्लॅशगन वापरावी लागते. ज्या कंपनीचा कॅमेरा आपण वापरत असू, त्याच कंपनीची व त्या कॅमेऱ्याच्या वैशिष्ट्यांवर आधारित फ्लॅशगन (त्याला डेडिकेटेड असे म्हणतात) जर आपण खरेदी केली, तर ते जास्त चांगले. कारण कॅमेऱ्यातील एक्‍स्पोजर मीटर उपलब्ध प्रकाशाचे मोजमाप करतो व जेवढा आवश्‍यक आहे तेवढ्याच प्रमाणात फ्लॅश वापरला जातो. इतरही अनेक वैशिष्ट्ये या फ्लॅशगनमध्ये उपलब्ध असतात. उदा. या फ्लॅशगनचा "स्ट्रोब'सारखा वापर आपण करू शकतो. त्याचप्रमाणे काही विशिष्ट कामांसाठी वापरात येणारे रिंग फ्लॅशही उपलब्ध असतात.
7. एक्‍सटेंशन ट्युब्ज व बेलोज - कधी कधी आपल्याला एखाद्या फुलाचा अथवा छोट्या वस्तूचा फोटो घ्यायचा असतो; पण कॅमेऱ्यावरील लेन्स इतक्‍या जवळच्या वस्तूवर फोकस करू शकत नाही; पण ज्या कॅमेऱ्याच्या लेन्सेस बदलता येतात, अशा कॅमेऱ्यावर आपण एक्‍सटेंशन ट्युब्ज अथवा बेलोज बसवून त्या छोट्या वस्तूवर फोकस करू शकतो. एक्‍सटेंशन ट्युब्ज व बेलोजची किंमत जास्त असते; पण कॅमेऱ्याच्या लेन्सवर बसवता येतील अशी काही भिंगेही उपलब्ध असतात. त्यांच्या किमती कमी असतात; पण त्याने दर्जावर परिणाम होतोच.
8. अतिरिक्त बॅटरी - कॅमेऱ्यातील सर्व क्रिया या बॅटरीवर चालत असल्याने कधीकधी अचानक बॅटरीची क्षमता संपून जाते. अशावेळी कॅमेऱ्याच्याच कंपनीची अतिरिक्त बॅटरी आपल्या संग्रही असलेली बरी!
9. मेमरी कार्डस - जी प्रकाशचित्रे आपण टिपतो ती सर्व कॅमेऱ्यांतील मेमरी कार्डवर साठवली जातात. मेमरी कार्डची क्षमता जितकी जास्त, तितकी जास्त प्रकाशचित्रे अथवा चलतचित्रे त्या कार्डवर साठवता येतात. आपल्या अंदाजाला डावलून कधीकधी कार्डची क्षमता संपून जाते. अशावेळी अतिरिक्त मेमरी कार्ड असेल, तर आपले काम अडून राहत नाही. आजकाल जास्त क्षमतेची व वेगवान अशी मेमरी कार्ड वाजवी किमतीत उपलब्ध आहेत.
10. कॅमेरा क्‍लिनिंग कीट - वातावरणातील धूळ, कचरा याला आपला किमती कॅमेरा सतत सामोरा जात असतो. तसेच कॅमेऱ्याची लेन्स बदलतानाही काही प्रमाणात धुळीचा संसर्ग होतोच. अशावेळी कॅमेरा सतत स्वच्छ ठेवण्यासाठी कॅमेरा क्‍लिनिंग कीट जवळ असणे उपयुक्त ठरते. यातील ब्लोअर ब्रशने वरवरची धूळ आपण सहजपणे हटवू शकतो.
11. कॅमेरा बॅग - आपला किमती कॅमेरा, लेन्सेस व आवश्‍यक अशा सर्व ऍक्‍सेसरीज व्यवस्थित ठेवता येण्यासाठी उत्तम दर्जाची कॅमेरा बॅग ही हवीच. धक्के शोषून घेऊ शकतील, असे वेगवेगळे कप्पे असलेल्या उत्तम नायलॉनपासून बनवलेल्या, पाण्यापासून सुरक्षित व वजनाला हलक्‍या अशा उत्तमोत्तम बॅग्ज आज बाजारात उपलब्ध आहेत.
या सर्व गोष्टींची खरेदी झाल्यावर काही नियम मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेवायला हवेत ः
- कॅमेरा व इतर उपकरणांची - धूळ, बारीक वाळू तसेच पाणी यापासून काळजी घ्या.
- कॅमेरा पट्ट्यात गुंफून गळ्यात अडकवलेला हवा.
- कॅमेरा व लेन्सवरील इलेक्‍ट्रिकल कॉन्टॅक्‍ट्‌सना स्पर्श करू नका.
- कॅमेरा व लेन्स स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही रसायनाचा वापर करू नका.
- जेथे तीव्र क्षमतेचे चुंबकीय क्षेत्र आहे, अशा ठिकाणी कॅमेरा व मेमरी कार्डस नेऊ नका.
- अतिथंड अथवा अति उष्ण तापमानात एलसीडी डिस्प्लेबरोबर काम करत नाहीत, असे तापमान टाळा.
- कॅमेरा जर जास्त काळासाठी वापरात नसेल, तर कॅमेऱ्यातील बॅटरी काढून ठेवा.
या नियमांचे पालन करून जर आपण प्रकाशचित्रण केले, तर उत्तम अशी "प्रकाशचित्रे' आपणहून तुमच्या संग्रहात येण्यास उत्सुक आहेतच. करा तर मग सुरवात!  


 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: