Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 

ई-बुक्सची दुनिया
रोहीत हरीप
Monday, April 17, 2017 AT 12:00 AM (IST)

ई-बुक्सची दुनिया

बदलत्या तंत्रज्ञानासोबत वाचनसंस्कृतीही दिवसेंदिवस कात टाकत आहे. पूर्वी पुस्तकांच्या खरेदीची ठिकाणे, दुकाने ठरलेली असायची. मुंबईच्या फोर्ट भागातील हुतात्मा चौक, पुण्याचा अप्पा बळवंत चौक, कोलकत्याचा कॉलेज स्ट्रीट ही ठिकाणे आजही पुस्तकांसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, तंत्रज्ञानामुळे हळूहळू पुस्तकांची खरेदी ही ऑनलाइन होऊ लागली. घसघशीत डिस्काउंट, घरपोच सेवा यामुळे पुस्तकाप्रेमींची चंगळ झाली. "ई-बुक'च्या उदयामुळे तर पुस्तके वाचणे एकदम सोपे होऊन गेले. ऍमेझॉन, फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांनी तर नुसता धुमाकूळ घातला आहे. स्वातंत्र्य दिवस, प्रजासत्ताक दिवस, ख्रिसमसच्या निमित्ताने मोठमोठे "शॉपिंग सेल' जाहीर करून पुस्तकांवर मोठी सूट जाहीर केली जाते. ऍमेझॉन कंपनीने किंडल हे "ई-बुक' रीडर बाजारात आणल्यानंतर पुस्तके वाचणे एकदमच सोपे होऊन गेले. हजार दोन हजार पानांचे पुस्तक तुम्ही सहज खिशात घालून कुठेही नेण्याची सोय झाली; तसेच एका वेळी शेकडो पुस्तके तुमच्या खिशात मावू लागली. प्रवासात, ऑफिसमध्ये, बसस्टॉपवर बसून वाचनाचा आनंद घेता येऊ लागला. किंडलनंतर आलेल्या स्मार्टफोनमुळे "ई-बुक' प्रत्येकाच्या हातात स्थिरावली. इंटरनेटवरून पुस्तके वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये डाउनलोड करून ती मोबाईलमध्ये भरून सहज वाचता येऊ लागली. आज पुस्तक वाचकांचे पारंपरिक वाचक आणि ई-बुक वाचक असे दोन पंथ निर्माण झाले आहेत. वाचकांना वाचकांसाठी वाहिलेल्या अशाच काही ऍप्स आणि वेबसाइटविषयी...

किंडल ऍप ः ऍमेझॉनने हे ऍप खास ऍड्रॉईड फोन वापरणाऱ्या लोकांसाठी तयार केले आहे. या ऍपमध्ये हजारो पुस्तके मोफत वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. किंडलची स्वतःची लायब्ररी आहे. ई-बुक वाचकांसाठी याआधी ऍमेझॉनने "किंडल- फायर' गॅझेट बनवले होते त्यातली सर्व वैशिष्ट्ये या ऍपला देण्यात आली आहेत. इंग्रजी पुस्तके प्रामुख्याने इथे वाचायला मिळतात. ऑक्‍सफर्डची डिक्‍शनरीची सोय या ऍपमध्ये करण्यात आली आहे. ज्यामुळे वाचताना एखादा शब्द तुम्हाला समजला नाही, तर त्याचा अर्थ लगेच डिक्‍शनरीमध्ये बघण्याची सोय आहे. त्याशिवाय पुस्तकाच्या नोट्‌स काढण्यासाठी वेगवेगळ्या रंगांचा वापर तुम्ही करू शकता. तुम्ही बुकमार्क पर्यायाचा वापर करून पुस्तक किती वाचून झाले, याच्या खुणा करू शकता. वाचताना डोळ्यांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने तुम्ही किंडल ऍपच्या प्रकाशाची तीव्रता कमी जास्त करू शकता. पुस्तके ऑनलाइन खरेदी करून किंडल ऍपच्या माध्यमातून वाचू शकता.
-------------
गुगल बुक्‍स ः "ई-बुक' ऍपच्या स्पर्धेत टिकण्यासाठी गुगलनेदेखील पुस्तकांसाठी स्वतःचे विशेष ऍप विकसित केले आहे. या ऍपचे वेगळेपण म्हणजे या ऍपवरून तुम्ही सुमारे तीन लाख पुस्तके मोफत डाउनलोड करून वाचू शकता. गुगलचेच हे ऍप असल्यामुळे सर्व ऍड्रॉईड फोनवर हे ऍप मोफत देण्यात आले आहे. पुस्तकांव्यतिरिक्त वेगवेगळ्या विषयांवरील मासिके, नियतकालिकेसुद्धा या ऍपद्वारे वाचता येतात.
--------------------
कोबो ई-बुक
जर तुम्हाला नेहमीची "ई-बुक' ऍप्स वापरून कंटाळा आला असेल, तर नक्कीच कोबो ऍप्स वापरून बघा. कोबोमध्ये इतर "ई-बुक'ऍप्सप्रमाणे मोफत पुस्तकांची सोय तर आहेच. मात्र त्यासोबतच "रीडिंग लाइफ' नावाचे विशेष फीचर देण्यात आले आहे. याचा वापर करून तुम्हाला तुम्ही वाचत असलेल्या पुस्तकांच्या नोंदी ठेवता येतात. कोणते पुस्तक कधी वाचले, रोज किती पाने वाचली यासारखी माहिती साठवून ठेवण्याची सुविधा कोबो ई-बुक हे ऍप देते; याशिवाय तुम्हाला आवडलेले पुस्तक, पुस्तकातील आवडलेली वाक्‍ये, संवाद, पुस्तकांची परीक्षणे तुम्हाला फेसबुकच्या माध्यमातून इतरांशी शेअर करता येतात.
--------------------
बिट-लिट
बाजारात नवीनच आलेले हे "ई-बुक' ऍप लवकरच सर्वांच्या चर्चेचा विषय बनले आहे. कागदी हार्ड बाउंड पुस्तके सर्वांनाच आवडतात; पण प्रत्येक ठिकाणी ही पुस्तके सोबत बाळगणे हे कधीकधी अडचणीचे ठरते. तेव्हा तुमच्या आवडीच्या पुस्तकांची ई-बुक आवृत्ती उपलब्ध आहेत की नाही, याची माहिती बिट-लिटच्या मदतीने आपल्याला मिळते. ज्या पुस्तकांच्या ई-बुक आवृत्ती उपलब्ध आहेत की नाही, याची माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बुकशेल्फची फोटो काढून तो "बिट-लिट' ऍपवर साठवला जातो. फोटोमधील पुस्तकांपैकी ज्या पुस्तकांची ई-बुक आवृत्ती उपलब्ध असते, त्याची माहिती आपल्या मोबाईलवर पाठवली जाते. त्यापैकी ज्या पुस्तकाची ई-बुक कॉपी तुम्हाला हवी असेल त्या पुस्तकाचा फोटो पुस्तकावर स्वतःचे नाव लिहून पुन्हा पाठवावा लागतो, मगच तुम्हाला कॉपी मिळते. थोडक्‍यात, ई-बुक आवृत्ती मिळवण्यासाठी स्वतःची पुस्तकाची प्रत असणे गरजेचे आहे.
-------------------------------------------
गुडरीड्‌स
गुडरीड्‌स ही वेबसाइट पूर्णतः पुस्तकांना वाहिलेली वेबसाइट आहे. या वेबसाइटचे वैशिष्ट्य म्हणजे जगभरातील भाषांमधील पुस्तकांची माहिती ही वेबसाइट देते. इथे जगभरातल्या पुस्तकप्रेमींना फेसबुकप्रमाणे फ्रेंड लिस्टद्वारे जोडता येते; मात्र येथे फेसबुकप्रमाणे फोटो किंवा बाकीची मनोरंजनाची साधने नाहीत. येथे चर्चा होते ती फक्त पुस्तकांचीच. तुमच्या मित्रयादीतील लोक कोणकोणती पुस्तके वाचत आहेत, त्याबद्दल त्यांनी कुठल्या पुस्तकाते परीक्षणे लिहिले आहेत, टीकाटिप्पणी केलेल्या आहेत याचे अपडेट्‌स गुडरीड्‌सद्वारे मिळतात. याशिवाय तुम्ही स्वतःच्या प्रोफाईलमध्ये स्वतःची एक लायब्ररी बनवू शकता. या लायब्ररीमध्ये तुम्ही स्वतः वाचलेली पुस्तके, तुम्हाला भविष्यात वाचायची आहेत अशी पुस्तके यांची नोंद ठेवता येते. तुम्हाला जर पुस्तक परीक्षणे लिहायची आणि वाचायची आवड असेल, तर तेही तुम्ही इथे करू शकता. तुम्ही लिहिलेली पुस्तक परीक्षणे जगभरातील लोकांकडून वाचली जातात, त्यावर प्रतिक्रिया मिळतात. नवीन वर्षाच्या सुरवातीला "इयर बुक चॅलेंज' नावाची एक छोटी ऍक्‍टीविटी येथे सुरू केली जाते. यामार्फत तुम्ही एकूण वर्षभरात किती पुस्तके वाचणार आहात, याची नोंद ठेवली जाते. तुम्ही सर्व माहिती फेसबुकवर शेअर करू शकता. पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी ही एक सर्वोत्तम वेबसाइट आहे.
---------------------------
नॅशनल डिजिटल लायब्ररी ऍप
भारत सरकारच्या शैक्षणिक धोरणानुसार सुरू करण्यात आलेल्या "नॅशनल डिजिटल लायब्ररी ऍप'मुळे आता घरबसल्या सुमारे पासष्ट लाख पुस्तके डाउनलोड करता येणार आहेत. आयआयटी खरगपूरच्या सहकार्याने हे अँड्रॉईड ऍप सुरू करण्यात आले आहे. फिक्‍शन वर्गातील पुस्तके प्रामुख्याने या ऍपवर मोफत डाउनलोड करता येतील; तसेच एनसीआरटीची सर्व क्रमिक पुस्तके या ऍपद्वारे मोफत वापरता येणार आहे. सध्या हे ऍप इंग्रजी, हिंदी, बंगाली या तीन भाषांमध्ये उपलब्ध आहे. इतर भारतीय भाषांमध्ये हे ऍप लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या ऍपचे वैशिष्ट्य म्हणजे हे ऍप मोबाईलशिवाय लॅपटॉप आणि कॉप्युटरवरसुद्धा वापरता येणार आहे.
------------------------------  


 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: