Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 

लहान मुले काय वाचतात
गौतमी औंढेकर , रोहित हरीप
Monday, April 17, 2017 AT 12:00 AM (IST)

लहान मुले काय वाचतात 
संकलन
गौतमी औंढेकर , रोहित हरीप
----
तनिष्का मगर,
इयत्ता सातवी, पुणे
. . . . .

माझ्या बाबांमुळे मला वाचनाची आवड लागली. त्यांच्या हातात पाहिलेले पुस्तक वाचले आणि ते खूप आवडलं तेव्हापासून वाचनाची सवय लागली. मला सहसा फिक्‍शनल पुस्तकं आणि गोष्टींच्या मालिका वाचायला आवडतात. आतापर्यंत वाचनात आलेल्या फिक्‍शनल पुस्तकांमध्ये "बुक ऑफ मिरदाद' आणि 'अल्केमिस्ट' ही दोन पुस्तके आवडली. गोष्टींमध्ये मला पर्सी जॅक्‍सन हे पात्र असणाऱ्या गोष्टी आवडतात. विशेषतः एनिड ब्लायटन आणि रिक रायर्डन या लेखकांची पुस्तके मला आवडतात. एनिड ब्लायटनच्या मिस्टरी सिरीजमधले "दि आयलंड ऑफ ऍडव्हेंचर' नावाचे पुस्तक जास्त आवडले. अब्दुल कलाम यांचे "दि टर्निंग पॉइंट' हे पुस्तक पण खूप आवडले. त्यातून विज्ञान आणि भाषा कशी शिकावी याची शिकवण मिळाली. मराठी पुस्तकांचे तेवढे वाचन होत नाही. पण आई अधून-मधून मराठी पुस्तकांमधल्या गोष्टी वाचून दाखवते. कॉमिक्‍समध्ये फक्त टिंकल नावाचे कॉमिक्‍स वाचते. शाळेच्या लायब्ररीतून आणि क्रॉसवर्डमध्ये जाऊन पुस्तक आणते. कोणतेही पुस्तक घेताना आधी त्याबद्दलचं वर्णन थोडक्‍यात वाचते आणि आवडले तरच पुस्तक घेते. अवांतर वाचनामुळे शब्दसाठा वाढतो आणि वेगवेगळ्या लोकांचा दृष्टिकोन वाचून आपल्या विचारांमध्ये फरक जाणवतो. त्यामुळेच अभ्यासात वेगळं पाठांतर करावं लागत नाही आणि उत्तरांची मांडणी सोपी जाते. मला लिखाण आवडतं. मी वेगवेगळ्या विषयांवर कविता आणि निबंध लिहिते.
---

प्रद्युम्न पाटील, इयत्ता आठवी

मी नुकतंच "चॅंपियन्स ऑफ मॅथेमॅटिक्‍स' नावाचं पुस्तक वाचून पूर्ण केले. मला भारतीय पौराणिक कथांविषयीची पुस्तके वाचायला आवडतात. शिवाय, मी "टेल मी व्हाय' नावाचे मासिक वाचतो. त्यातून वेगवेगळ्या विषयांवरची माहिती मिळते. मला "श्‍यामची आई' पुस्तक पण खूप आवडले. त्यामध्ये श्‍यामचा सगळा प्रवास वाचताना आईचे महत्त्व कळते. काही गोष्टी वाचून तर रडायलाच येते. मी "जातका टेल्स' पण वाचल्या आहेत. माझ्या ताईने मला सुधा मूर्तींची "मॅजिक टेल्स ऑफ लॉस्ट टेम्पल' आणि "अनयुज्युअल टेल्स ऑफ महाभारता' ही पुस्तके आणून दिली होती. "अनयुज्युअल टेल्स ऑफ महाभारता' या पुस्तकातून तर महाभारताविषयी जास्त माहिती नसलेल्या गोष्टी पण कळाल्या. शाळेतून घरी आलो की थोडा वेळ खेळतो आणि मग उरलेला मोकळा वेळ वाचन करतो. टीव्ही पाहायला मला आवडत नाही. कारण एखादी गोष्ट टीव्हीवर पाहण्यापेक्षा पुस्तक वाचून आपण जास्त चांगल्या पद्धतीने इमॅजिन करू शकतो. माझी मोठी बहीण मला वेगवेगळी पुस्तके आणून देते. आता ती मला सचिन तेंडुलकरचे आत्मचरित्र वाचायला आणून देणार आहे.
----

तनिष्का जाधव,
इयत्ता सहावी
मी गोष्टींची पुस्तकं जास्त वाचते. पुस्तक वाचताना एक वेगळाच आनंद मिळतो. मला अकबर बिरबलाच्या गोष्टी आवडतात. परिकथा वाचायला पण खूप आवडतात. मी आतापर्यंत वाचलेल्या परिकथांमध्ये "बिग फ्रेंडली जाएंट' नावाची गोष्ट खूप आवडली होती. कृष्ण, श्रीराम अशा पौराणिक पात्रांची माहिती कॉमिक्‍समधून वाचायला मिळते. शाळेत वाचनाशी निगडित वेगवेगळे प्रोजेक्‍ट्‌स असतात. शाळेतूनसुद्धा काही पुस्तके घरी वाचायला आणता येतात. शिवाय, माझ्या ज्या मैत्रिणी वेगवेगळी पुस्तके वाचतात त्यांच्याकडून मी काही पुस्तके घेऊन वाचते. पुस्तके वाचल्यामुळे इतरांपेक्षा जास्त नवीन शब्द आणि माहिती कळत जाते.
---
श्रद्धा कुलकर्णी,
इंजिनिअरिंग द्वितीय वर्ष
रहस्यकथा आणि विज्ञानकथा जास्त आवडतात. जयंत नारळीकरांची बऱ्यापैकी पुस्तके वाचून झालीयेत. त्यांचं "यक्षांची देणगी' हे पुस्तक मला आवडतं. म्हणजे अशा प्रकारच्या पुस्तकांमध्ये सगळ्या गोष्टी अगम्य वाटतात, पण त्यामागे काहीतरी विज्ञानसुद्धा असते. दुसरा प्रकार म्हणजे आत्मचरित्रं वाचायला आवडतात. श्रीखंडे डॉक्‍टरांचे आत्मचरित्र "आणि दोन हात' हे मला सगळ्यात जास्त आवडले आहे. या पुस्तकात त्यांच्या आतापर्यंतच्या वेगवेगळ्या शस्त्रक्रियांचे अनुभव आहेत. याशिवाय, इतिहास, ललित, कादंबऱ्या अशी सगळीच पुस्तके मी वाचते. रणजित देसाईंची श्रीमान योगी आणि स्वामी ही दोन पुस्तकेसुद्धा खूप आवडली. माझ्या वाचनाची सुरवात शाळेपासून झाली. लहानपणी चांदोबा, पंचतंत्र, विक्रम वेताळपासून सुरवात झाली मग बाबांनी बोक्‍या सातबंडे, फंटास्टिक फालुदा अशी लहान मुलांची आणखी पुस्तके वाचायला दिली. त्यानंतर मग हळूहळू इतिहासाच्या पुस्तकांकडे वळविले. मग वैज्ञानिक पुस्तके वाचायला दिली. आमच्याकडे माझे बाबा आणि काकांना जी पुस्तकं आवडतात ती ते दोघं घरी आणतात. त्यामुळे आमच्या घरी छोटंसं एक ग्रंथालयच तयार झालंय. कॉलेजमध्ये आल्यानंतर आधीसारखं सतत वाचन होत नाही. आता अभ्यासाशी निगडित अशा गोष्टीचं जास्त वाचन होते. मी आधी पुस्तके वाचायचे पण आता रिसर्च पेपर्स, आर्टिकल्स जास्त वाचली जातात. पण नुकतेच वाचलेले म्हणजे आमिष त्रिपाठीची शिवा ट्रायोलॉजी. आता एकदा मला "गेम ऑफ थ्रोन्स'ची सगळी पुस्तकं वाचायची आहेत.
----

देवव्रत पत्की, इंजिनिअरिंग
विशेषतः पौराणिक, विज्ञानकथा अशा प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात. मला आतापर्यंत आमिष त्रिपाठीची शिवा ट्रायोलॉजी, सायन ऑफ इक्ष्वाकू, ख्रिस्तोफर सी डॉयलची महाभारता क्वेस्ट आणि महाभारता सिक्रेट ही पुस्तकं जास्त आवडली. महाभारत हा तर माझ्या आवडीचा विषय आहे. त्यामुळे या विषयाच्या जितक्‍या वेगवेगळ्या पैलूंवरचं लिखाण मिळेल ते मी वाचतो. शिवाय, कुमाऊंचे नरभक्षक, कृष्णमेघ कुंटे यांच "एका रानवेड्याची शोधयात्रा' यासारखी ही पुस्तके पण खूप आवडली आहेत. बाबासाहेब पुरंदरेंचे "शेलारखिंड' हे माझं सगळ्यात आवडतं पुस्तक आहे. कोणीतरी सुचवलेले किंवा मग बहुतेकवेळा वर्तमानपत्रातलं परीक्षण वाचून मी कोणते पुस्तक वाचायचे ते ठरवतो. मी शाळेत असताना खूप वेगवेगळी पुस्तके वाचायचो. तुलनेत कॉलेजमध्ये आल्याने तर ते थोडंसं कमी झाल आहे. पण आता मी बरीच "मांगा' ऑनलाइन वाचतोय. जपानी भाषेत प्रसिद्ध होणाऱ्या कॉमिक्‍सना "मांगा' म्हणतात. "ऍनिमेटेड कार्टून्स' याच मांगांपासून तयार होतात. मला वनपिस, नरुटोसारखी मांगा आवडली आहेत.
. . . . . .  
वाचन आणि लहान मुले
मला पुस्तके वाचायला आवडतात. घरात लहानपणापासून कायम पुस्तके पाहिल्यामुळे पुस्तक वाचायला आवडतात. हॅरी पॉटर, शिवा ट्रायोलॉजी, सुधा मूर्ती, शेरलॉक होम्स ही पुस्तके मी वाचली आहेत. बाबासाहेबांचे "शेलारखिंड' हे पुस्तक मला खूप आवडले. मला अनुवाद केलेली पुस्तके फारशी नाही आवडत कारण इंग्रजीमधून अनुवाद केलेली मराठी भाषा वाचायला थोडी विचित्र वाटते. पुस्तके वाचताना त्यातले वातावरण, पात्रे याबद्दल माहिती मिळवायला आवडते. सुरवातीला इंग्रजी पुस्तके वाचताना थोडा वेळ लागायचा, शब्द अडायचे; पण आता सवय झाली. पुस्तकांवर आधारित सिनेमेसुद्धा मला बघायला आवडतात. कारण पुस्तकातील पात्रे पडद्यावर प्रत्यक्ष बघायला मजा येते. माझ्या मैत्रिणींनासुद्धा पुस्तके वाचायची आवड आहे, त्यामुळे आमच्यात पुस्तकांची देवाणघेवाण सारखी होत असते. मी ज्ञानप्रबोधिनी शाळेमध्ये शिकते. आमच्या शाळेच्या लायब्ररीमध्ये खूप पुस्तके वाचायला मिळतात. तसेच शाळेच्या लायब्ररीतून तुम्ही कुठलेही पुस्तक घरी नेऊ शकता. एका वेळी तीन पुस्तके घरी न्यायची मुभा असल्याने भरपूर पुस्तके वाचायला मिळतात. दरवर्षी कोणी किती पुस्तके वाचली याची नोंद आमच्या प्रगती पुस्तकात होत असते, त्यामुळे किती पुस्तके वाचली याची नोंद राहते. या वर्षी मी पंचवीस पुस्तके वाचली आहेत. पुस्तकांबरोबर वर्तमानपत्रसुद्धा अधूनमधून वाचायला आवडते. आईबाबांच्या व्हॉट्‌सऍपवर येणारे लेख, बातम्या वाचायला आवडतात.
----------------------------
 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: