Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 

स्वप्ने बिझनेस ऍनॅलिस्टची!
- डॉ. श्रीराम गीत
Monday, April 17, 2017 AT 12:00 AM (IST)
स्वप्ने बिझनेस ऍनॅलिस्टची!


कॉर्पोरेट जगत, त्यातही एमएनसी कंपनी - मल्टिनॅशनल कंपनी याचे आकर्षण कोणाला नसते? अशा कंपन्यांबद्दलच्या सुरस कथा सारेच जण नोकरी शोधताना किंवा बदलताना अत्यंत चवीचवीने चघळत असतात. भरगच्च पॅकेज, बोनस, चकचकीत इमारतीतील एसी ऑफिस, अधूनमधून परदेश प्रवास आणि हो शनिवार व रविवारची आख्खी सुटी देणारी कंपनी हवीच. अशा कंपन्यांमध्ये नोकरीचा राजमार्ग होता, तो फक्त एमबीए करून शिरकाव करून घेण्याचा! त्यातच गेल्या दहा - पंधरा वर्षांत अजून एका नवीन शब्दांची भर पडली आहे, तो म्हणजे बिझनेस ऍनॅलिस्ट.
संभ्रमित करणारे मात्र नक्की आकर्षित करून घेणारे विविध करिअरचे प्रकार आपण समजून घेत असल्याने याही शब्दामागचे गौडबंगाल आज उलगडून पाहूया. त्यालाही तसेच एक कारण गेल्या वर्षात सतत समोर आले आहे. किमान तीन इंजिनिअरिंग कॉलेजात शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या समोर बोलताना, प्रश्नोत्तरांमध्ये हा शब्द वापरून कोणी प्रश्न विचारला नाही असे घडलेच नाही. थोडक्‍यात म्हणजे सध्याच्या इंजिनिअर्स व एमबीएवाल्यांच्या कट्ट्यावरचा हा कल्ला करणारा "बझबर्ड' बनला आहे.
बिझनेस ऍनॅलिस्ट करतो तरी काय?
या प्रश्नाचे एक उत्तर म्हणजे, तो काय करत नाही? इतके व्यापक आहे. तरीही एक सुसंबद्ध यादीच आपण इथे बनवली तर?
1) सर्व संबंधितांच्या अपेक्षांना समजून घेणे, हे त्याचे पहिले काम असले. या अपेक्षा समजल्या तर कंपनीच्या उद्दिष्टपूर्तीसाठीच्या समस्यांवर उत्तरे शोधायचे रस्ते कसे शोधायचे हे काम तो करतो.
2) सध्या तंत्रज्ञानाची सर्वत्र चलती आहे. पण वर उल्लेख केलेल्या समस्या सोडविताना कोणचे तंत्रज्ञान कसे वापरायचे, या दोन्हींचा मेळ कसकसा घालावा याचे मार्गदर्शन तो करत असतो.
3) अर्थातच प्रोजेक्‍ट म्हणजे काय, त्याचे आरेखन कसे केले जाते, तो पूर्ण करताना अनेकांशी संपर्क साधून त्यांची सहकार्याची मोट कशी बांधायची याचेही मार्गदर्शन करणे ही त्याच्या कामाची जबाबदारी असते.
4) या आधी पाहिल्याप्रमाणे व्यवसायाच्या गरजा व त्यासाठीच्या तांत्रिक पाठबळाच्या विविध गोष्टी या कुठून मिळवायच्या यावर तो गरजेनुसार काम करतो.
5) अर्थातच अर्थपुरवठा आणि अर्थआयोजन या दोन महत्त्वाच्या गोष्टींचे विश्‍लेषण करणे हा तर त्याच्या कामाचा एक गाभाच म्हणावा लागेल. मुख्य म्हणजे ज्याला फायनान्शियल फ्लो चार्ट असे एमएनसीच्या भाषेत सतत म्हटले जाते, तो तयार करणे, वाचणे व त्यात गरजेनुसार बदल करण्याची क्षमता असणे या अत्यंत किचकट कामाशी तो संबंधित असतो.
धोक्‍याची सूचना ः
अर्थातच हा विषय प्रॉडक्‍शनचा आहे, तो विषय सेल्सचा आहे, पर्चेसचा माझा काय संबंध, बॅंकेचे कर्ज कसे फेडायचे ते मालक पाहतील, माझा तर मार्केटिंगशी काडीचाही संबंध नाही. ही वाक्‍ये विविध विभागप्रमुख ऑपरेशन्स प्रमुखाला म्हणजे हल्लीच्या भाषेत सीओओला किंवा त्याच्यावरच्या सीईओला ऐकवू शकतात. मात्र हा बिझनेस ऍनॅलिस्ट डोक्‍यावर बर्फाची पिशवी ठेवून या साऱ्यांच्या वागण्याचा, बोलण्याचा अर्थ लावून त्याचे विश्‍लेषण करण्याचे रात्रंदिवस काम करत असतो. हा त्याच्या मेंदूला इतका खुराक असू शकतो, की जेवणाच्या ताटात किंवा झोपेतील स्वप्नातसुद्धा त्याला हे सारे दिसू लागते. हा उल्लेख आवर्जून इथे करत आहे, कारण "हे माझे काम नव्हे' हा खास बाणा, अभिमानाने सांगणारी व स्वतःच्या आई-वडिलांनाही ते ऐकवणारी मुले-मुली घरोघरी सापडतात. मात्र त्यातील अनेकांना बिझनेस ऍनॅलिस्ट बनायचे स्वप्न मात्र रोज पडत असते.
6) बिझनेस ऍनॅलिस्टला अनेक व्यावसायिकांबरोबर सतत काम करण्याची गरज असते. म्हणजेच आयटी, टेलिकॉम, फायनान्स, बॅंकर्स, इन्फ्रास्ट्रक्‍चर्स या साऱ्यांच्या हातभाराशिवाय कंपनीचे उद्दिष्ट पूर्ण होणार नसते. या प्रत्येकाच्या सहभागावरतच त्याचे विश्‍लेषण सुरू होते आणि त्यातूनच विविध निष्कर्ष काढण्याचे काम केले जाते.
7) असे सारे करता करता, शिकता शिकताना एक दिवस हा बिझनेस ऍनॅलिस्ट यशस्वितेच्या पायऱ्या चढू लागतो. थोडक्‍यात, कंपनीमधली प्रत्येक महत्त्वाची व्यक्ती त्याच्याकडे कौतुकाने, क्वचित आदराने पाहू लागते. पण त्यामागे त्याचे टीम लीडर न बनता उत्कृष्ट टीम प्लेअर बनण्याचे कौशल्य दडलेले असते. तोसुद्धा कसा टीम प्लेअर, तर जिथे कमी तिथे मी, हेच त्याचे म्हटले तर बोधवाक्‍य असू शकते. एकाच वेळी अनेक टीम्स विविध विभागांत अनेक कामांत (क्रॉस फंक्‍शनल टीम्स) गर्क असतात. कोण मागे पडतो आहे, त्याची कारणे शोधून त्यावर उत्तरे शोधणारा हा यशस्वी बिझनेस ऍनॅलिस्ट समजला जातो.
हा लेख वाचणाऱ्यांनी म्हणजेच मुला-मुलींच्या पालकांनी एव्हाना एकच शब्द तोंडातून नक्की काढला असेल, तो म्हणजे हुश्‍शश!
ऍनॅलिस्ट कसा शोधतात ः
अर्थातच या कामाकरिता योग्य व्यक्ती शोधताना त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी अत्यंत महत्त्वाची ठरते. इथे मी शैक्षणिक पार्श्वभूमी म्हणजे एका वेगळ्याच गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छित आहे. सातत्य, सातत्य आणि त्यातही किमान प्रगती दरवर्षी असा आलेख असणारीच व्यक्ती यासाठी निवडण्याचा कोणत्याही एमएनसीचा कल असतो. कारण कामाच्या दडपणाखाली मानसिक खच्चीकरण होऊन पळ काढणारी व्यक्ती कोणालाच नको असतो.
दुसरी महत्त्वाची पुन्हा पुन्हा तपासली जाणारी गोष्ट म्हणजे लॉजिक वा तर्कबुद्धी. ही ज्याची अत्यंत लखलखीत आहे, त्यानेच बिझनेस ऍनॅलिस्ट बनण्याचा विचार करावा. थोडक्‍यात का, कधी, कसे, केव्हा, कोणी या साऱ्यांची उत्तरे मिळाल्याशिवाय समोरच्या कोणत्याही विषयासंदर्भात जो थांबत नाही, सतत अस्वस्थ राहतो तो या प्रकारात मोडतो. इथे माझा विषय असे म्हटलेले नसून कोणत्याही विषयात हे अपेक्षित आहे.
अर्थातच या साऱ्याला जोड लागते ती गणित व संख्याशास्त्राची. इथे गणितातील मार्क फारसे उपयोगी पडत नाहीत. गरज पडत असते ती कोणते सूत्र कुठे व का लावायचे याचे तर्कशुद्ध उत्तर देण्याची!
बिझनेस ऍनॅलिस्ट शोधताना अजून एक गोष्ट बारकाईने पाहतात. ती म्हणजे, लीडर का प्लेअर. टीम लीडर व टीम प्लेअर यातील फरक ताज्या भारत - ऑस्ट्रेलिया मालिकेसंदर्भात सहज उलगडू शकतो. रवींद्र जडेजा हा मुळातील फलंदाज गडी या साऱ्या मालिकेत गोलंदाज म्हणून गाजला. आता तर तो सध्या जागतिक दर्जाच्या अष्टपैलूंच्या आकडेवारीशी स्पर्धा करू पाहत आहे. या मालिकेआधी जडेजा अष्टपैलू आहे, असे वाक्‍य कधीच कोणी ऐकले नव्हते. कुठेही, कसेही क्षेत्ररक्षण करतानाची उत्कृष्ट भूमिका बजावणारे एकनाथ सोलकर, राहुल द्रविड यांची नावे पटकन आठवतात, अगदी तसेच इथे घडते. बिझनेस ऍनॅलिस्ट हा उत्तम टीम प्लेअर असणे फार महत्त्वाचे असते. तो जरी उत्तम लीडर असला तरी ती भूमिका ऍनॅलिस्ट बनताना त्याला दूर सारावी लागते.
या साऱ्या गुणावगुणांचा धांडोळा घेताना विविध कॉर्पोरेट कंपन्या पुन्हा एका महत्त्वाच्या मुद्द्यावर येतात. कंपनीच्या प्रत्येक बाबतीतील अत्यंत गोपनीय असा तपशील या व्यक्तींच्या हाती सोपवायचा असतो. याचा परिणाम कसकसा होऊ शकतो यावर प्रत्येक कंपनीला स्वतःचा असा वेगळा निर्णय घ्यावा लागतो. तो पूर्णपणे वेगवेगळा असू शकतो. काही जण याच कारणास्तव अशी वेगळी पोस्ट निर्माण करायचे टाळतात. याऊलट कंनी जर डायनॅमिक, ऍग्रोसिव्ह व व्हिजनरी व्यक्तींच्या हाती असेल तर ते अशा व्यक्तींचा सतत शोध घेत राहतात.
हा शोध सहसा आयआयटीमधले टॉपर्स व आयआयएम वा तत्सम पातळीवरच्या सर्वोत्तम मॅनेजमेंट संस्थांपुरताच मर्यादित राहतो. फारच क्वचित पुणे, मुंबई, दिल्ली, चेन्नाई, हैदराबाद, बंगळूर येथील नामवंत इंजिनिअरिंग कॉलेजातील काहींची निवड केली जाते. दुर्दैव असे आहे, की या साऱ्याचा सखोल विचार न करता या मंडळींना दिल्या जाणाऱ्या पॅकेजची एक ठळक पहिल्या पानावरची बातमी बनते. अनेकदा वीस ते पन्नास लाखांची पॅकेज मिळवणारी, कॅम्पसमधून सिलेक्‍ट केलेली मुले-मुली या कामाकरिता निवडली जातात. हे एक वास्तव समजून घेतले, तर खूपसा संभ्रम दूर होऊ लागतो. थोडक्‍यात, ही ऑलिंपिकसाठीची स्पर्धा आहे, हे लक्षात घ्यावे.
अन्य पर्यायी मार्ग आहेत काय?
नक्कीच पर्यायी मार्ग आहेत. इंजिनिअर म्हणून पदवी घेऊन उत्तम मॅनेजमेंट संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठीची तयारी किमान दोन ते तीन वर्षे करावी लागते. कारण स्पर्धाच तशी तीव्र असते. या दरम्यान घरी बसून अभ्यास न करता नोकरीमधील विविध कामांचा अनुभव घेणे महत्त्वाचे राहते. ज्या अमेरिकेची स्वप्ने प्रत्येक इंजिनिअर पाहतो, त्या अमेरिकेत किमान दोन वर्षांचा नोकरीचा अनुभव असल्याशिवाय मॅनेजमेंट अभ्यासक्रमाला प्रवेश देत नाहीत हे प्रखर वास्तव मात्र आपण सारेच विसरतो.
जी मुले-मुली एमबीए प्रवेश परीक्षेच्या तयारीकरिता क्‍लास लावून घरी बसतात त्यांच्यासाठी हा रस्ता नक्कीच नाही. थोडक्‍यात, पाण्यात न उतरता पोहायला शिकता येत नाही तसेच!
उत्तम मॅनेजमेंट स्कूलची अभ्यासातून मिळविलेली पदवी व त्यानंतर असिस्टंट मॅनेजरला दोन-तीन वर्षांचा अनुभव यानंतर बिझनेस ऍनॅलिस्टची स्वप्ने जरूर पाहावीत. त्यात यश मिळू शकते. 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: