Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 

कट्टा
(प्रतिनिधी)
Monday, April 17, 2017 AT 12:00 AM (IST)

कट्टा
उत्तर प्रदेशातले संन्यस्त पर्व?
------------------------
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ हे योगी आहेत.
तरुण वयातच त्यांनी संन्यासाची दीक्षा घेतली.
भगव्या वस्त्रांचा त्यांचा पेहराव आहे. संन्यासी असल्याने जीवन व राहणीमानात साधेपणा अपरिहार्यच आहे.
अर्थात ते योगी आणि संन्यासी असले तरी त्यांचे राहणीमान, आहार या सर्व बाबतीत अत्यंत काटेकोरपणा पाळला जातो. अत्यंत शिस्तबद्ध व अनुशासित अशी त्यांची जीवनशैली असल्याचे सांगण्यात येते.
उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री निवासात(5 कालिदास मार्ग) वास्तव्याला गेल्यानंतर त्यांच्या या साध्या जीवनशैलीची छाप तेथेही पडणे अटळ होते. तसेच घडले. सर्वप्रथम त्यांनी मुख्यमंत्री निवासाची विधिवत शुद्धी केली आणि त्यानंतरच ते तेथे राहण्यास गेले.
सर्वप्रथम आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या (अखिलेश) दिमतीला असलेल्या चिनी व कॉंटिनेंटल पदार्थ तयार करणाऱ्या खानसाम्यांची सुटी करण्यात आली. आधीच्या कुटुंबवत्सल मुख्यमंत्र्यांच्या काळात या खानसाम्यांची गरज भासली असावी.
योगी आदित्यनाथ हे साधा आहार घेतात. आणि हो, त्यांचे अनेक वर्षे वैयक्तिक सहायक व खानसामा आहेत, त्यांनीच तयार केलेला असतो. इतर कोणाच्या हातचा आहार ते घेत नसल्याचे सांगितले जाते. हे भोजनही ते त्यांच्या ठरलेल्या तांब्याच्या थाळीतच जेवतात.
या बंगल्याला बारा एअर कंडिशनर लावलेले आहेत; परंतु आदित्यनाथ यांनी त्यांचीही आवश्‍यकता नसल्याचे सांगितले. गोरखपूरच्या मंदिराचे ते महंत आहेत. त्यांना अद्याप एअर कंडिशनरची आवश्‍यकता भासलेली नाही असे सांगण्यात येते. त्यामुळे या मुख्यमंत्री निवासातून एअर कंडिशनर यंत्रेदेखील हद्दपार होण्याच्या तयारीत आहेत.
आदित्यनाथ योगी असल्याने त्यांना सर्वसाधारण माणसाला ज्यामध्ये रुची असते अशा कोणत्याच आवडीनिवडी असण्याची शक्‍यता नाही. त्यामुळेच मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांनी कामाचा नुसता सपाटा लावला आहे.
त्यांच्यासाठी कामाच्या निश्‍चित वेळा नाहीत.
एकदा सकाळी मंत्रालयात आल्यानंतर जाण्याची वेळ निश्‍चित नाही.
ते मुख्यमंत्री झाल्यापासून जवळपास रोजच लखनौमधील सचिवालयाचे कामकाज मध्यरात्रीपर्यंत सहज चालू असते.
यामुळे नोकरशाही चिंताग्रस्त झाली आहे. एकाचा किस्सा तर प्रसिद्धही झाला. या नोकरशहाला रात्री 1 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांबरोबर काम करावे लागले आणि सकाळी पुन्हा आठ वाजता त्यास पाचारण करण्यात आले.
हा नोकरशहा निवृत्तीला आलेला आहे. त्यास रक्तदाब आणि मधुमेह आहे. अशारीतीने काम करायला सुरवात झाल्यास आपण स्वेच्छानिवृत्ती घेऊ असे तो म्हणाला.
केवळ नोकरशहाच नव्हे तर योगीसाहेबांच्या मंत्र्यांमध्येही कामाची धास्ती निर्माण झाली आहे.
म्हणजेच उत्तर प्रदेशात आता संन्यस्त युगाचा प्रारंभ झाला संन्यस्त पर्व सुरू झाले असे म्हणायला हरकत नाही!
----------------------------------------------------------------
अल्वर घटना? छे! छे! स्वीडनच्या घटनेबद्दल दुःख
----------------------------------
काही गोष्टी खरोखर बेचैन करतात.
समाजात माणुसकी आहे की नाही असा प्रश्‍न निर्माण होतो तेव्हा ही बेचैनी आणखी खुपते.
राजस्थानात अल्वर येथे हरयानातला एक दूध व्यावसायिक पेहलू खान याला बेदम मारहाण करून जिवे मारण्यात आले.
तथाकथित गोरक्षकांनी हा प्रकार केला. केवळ गाय नेत असताना संशयावरून विनाचौकशी त्याच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या बातम्या, चित्रफिती सर्वत्र पाहण्यास मिळाल्या आहेत.
एवढी भयंकर घटना घडूनही देशाचे पंतप्रधान मौनावस्थेत आहेत. घडीघडी ट्‌विट करण्याबद्दल प्रसिद्ध असलेले पंतप्रधान व त्यांचे मौन आचंबित करणारे आहे.
पंतप्रधानांचे ठीक आहे. त्यांना देशाचा कारभार करायचा असतो.
पण राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचे काय?
त्यांनी चकार शब्दाने या भयंकर दुर्घटनेची साधी दखलही घेतली नाही.
म्हणे त्या धोलपूर पोटनिवडणुकीत "बिझी' होत्या!
पण अल्वरच्या घटनेबद्दल उदासीन असलेले हे नेते स्वीडनमध्ये दहशतवादी हल्ला झाला, त्याबाबत मात्र विलक्षण तत्पर आणि जागरूक आढळले.
पंतप्रधान आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी स्वीडनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची तत्काळ दखल घेतली. त्याचा निषेध करून ते स्वीडनच्या जनतेबरोबर आहेत, त्यांच्या दुःखात सहभागी आहेत वगैरे सहानुभूतीच्या भावना त्यांनी ट्‌विटद्वारे व्यक्त केल्या.
वा भाई वा! आमच्या पंतप्रधानांना, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना स्वीडनच्या दुःखात सहभागी होता येते. ते त्यांनी जरूर व्हावे! पण स्वतःच्याच देशात निरपराधांच्या हत्या आणि त्याही सत्तापक्षाशी संलग्न अशा गोरक्षकांकडून होत असताना मात्र त्यांची वाचा बसते! चांगला न्याय आहे!
पंतप्रधान इतर सर्व विषयांवर भरभरून बोलत असतात; पण असे मुस्लिमांच्या हत्येबाबतचे विषय आले की त्यांच्या वाणीला अचानक लगाम कसा बसतो हे गूढ व रहस्यमय आहे!
--------------------------------------
हांऽऽऽऽऽ, का हो धरिला मजवरी राग ?????
--------------------------------------
हल्ली सरकारी म्हणजेच पंतप्रधानांची कोणावर खप्पा मर्जी होणे, त्यांची नाराजी होणे ही चांगलीच गंभीर गोष्ट मानली जाते. हो, उत्तर प्रदेशातील विजयानंतर पंतप्रधानांचे नेतृत्व निर्विवाद झाले आहे. कोणीही त्यांना आव्हान देऊ शकत नाही असे ते अभंग नेतृत्व झाले आहे!
तर, एका भल्या मोठ्या, राष्ट्रीय माध्यम समूहाने एक भलीमोठी उद्योग-व्यवसाय शिखर परिषद आयोजित केली होती.
या माध्यमसमूहाचा दबदबा लक्षात घेता उद्योग-व्यवसाय क्षेत्रातली बडीबडी दिग्गज मंडळी हजेरी लावणार होती.
याच मालिकेत या माध्यमसमूहाने साक्षात पंतप्रधान साहेबांना एक दिवसासाठी निमंत्रित केलेले होते. त्यांनी त्यास मंजुरीही दिली होती कारण तसे पंतप्रधान, भाजपशी जवळीक असलेलाच हा समूह मानला जातो.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर लगेचच ही परिषद होणार होती.
पंतप्रधान परिषदेला जाणार म्हटल्यानंतर अर्थमंत्र्यांपासून इतर अनेक केंद्रीय मंत्र्यांनीही या परिषदेची निमंत्रणे स्वीकारली होती.
पण कुठे माशी शिंकली देव जाणे! आयत्यावेळी, अगदी शेवटच्या क्षणाला पंतप्रधानांनी या समूहाच्या परिषदेला जाण्याचे रद्द केले. हा फार मोठा धक्का होता.
पंतप्रधानांनी जाणे रहित केल्यानंतर मग काय? इतर केंद्रीय मंत्र्यांनीदेखील गैरहजर राहण्याचे ठरवले.
कशीबशी परिषद आटोपली.
पण हे अवचित घडले कसे?
असे सांगतात की या समूहाचे सर्वेसर्वा मालक भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे जाऊन घडलेल्या फटफजितीबद्दल नाराजी व्यक्त करू लागताच शहा यांनी त्यांच्यापुढे काही फायली टाकल्या.
या फायलींमध्ये त्यांच्या माध्यमसूमहाने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि अखिलेश यांचा वरचष्मा कसा आहे आणि ते पुन्हा निवडून येण्याची शक्‍यता कशी आहे अशा पद्धतीने सर्व बातम्या दिलेल्या होत्या. बातम्यांचा सर्व रोख आणि प्रकाश हा समाजवादी पक्षाला कसा अनुकूल ठेवण्यात आला होता, भाजपला कसे डावलण्यात आले होते, याचा सारा हिशेब शहांनी या मालकांना ऐकवल्याचे सांगितले जाते.
मुकाट्याने निघून गेले.
आता हे मालक आणि हा माध्यमसमूह काय करणार?
वाट पाहा!
------------------------------------------
"तो हात' कुणाचा?
-----------------
शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी जे कथित मारहाण कांड केले, त्यामुळे त्यांना उदंड प्रसिद्धी मिळाली. अशी आणि एवढी प्रसिद्धी त्यांना कदाचित त्यांनी केलेल्या चांगल्या कामांमुळेदेखील मिळू शकली नसती!
रवींद्र गायकवाड हे तसे फारसे बोलणारे खासदारही नाहीत.
किंवा संसदेतील त्यांच्या आचरणावरून ते अशी मारहाण करू शकतील असा अंदाजही बांधता येत नाही.
परंतु काहीतरी घडले खरे!
लोकसभेतही या प्रकरणावरून शिवसेनेने त्यांच्या खास पद्धतीने आणि शैलीत "राडा'ही घातला.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी गायकवाड आणि शिवसेनेला या प्रकरणात जाणूनबुजून बदनाम करण्याचा हा डाव आहे आणि यामागे कुणाचा हात आहे, याची माहिती शिवसेनेकडे आहे. तो हात योग्यवेळी आम्ही उघडकीस आणू!
आता चर्चा ही आहे की "हा हात कुणाचा?'
चर्चा अशी आहे की गायकवाड प्रकरण सुरू झाले, त्या वेळी एका वरिष्ठ केंद्रीय मंत्र्याने भाजपच्या लोकांना याबाबत शिवसेनेची फारशी बाजू घेऊ नका असे सांगितले.
या प्रकरणी संसदेत हंगामा झाल्यानंतर एका राज्यमंत्र्याने बाजू सावरण्याचा प्रयत्न केल्यानंतर या वरिष्ठ मंत्रिमहोदयांनी त्यांनाही म्हणे झापले होते. या मंत्रिमहोदयांनी खासगीत बोलताना अशीही टिप्पणी केल्याचे समजले की,आता शिवसेनेला कसे वाटते? "सामना'मधून मोदींपासून भाजपवर वाटेल ती टीका करताना मजा वाटते ना? आता ही मजा शिवसेनेने घ्यावी!
शिवसेनेला या मंत्रिमहोदयांचे नाव समजलेले आहे. या मंत्रिमहोदयांना अशा किल्ल्या फिरविण्याची खूप सवय आहे; पण ते एका अतिशय महत्त्वाच्या खात्याचे मंत्री असल्याने व त्यांचा सरकारमध्ये खास दबदबा असल्याने शिवसेनेनेही जरा सबुरीने घेण्याचे ठरवले आहे. "ठंडा कर के खाओ' असा गनिमी कावा बहुधा शिवसेनेने आखला असावा!
---------------------------------
घर घर की कहानी!
----------------
प्रणव मुखर्जी जुलैमध्ये राष्ट्रपतिपदावरून निवृत्त होतील. सरकारने त्यांच्या निवृत्तीकाळासाठी 10 राजाजी मार्ग हे निवासस्थान मुक्रर केल्याचे सरकारी गोटातून सांगितले जाते.
दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम हे निवृत्तीनंतर याच बंगल्यात राहात होते.
यापूर्वी लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा यांच्या निधनानंतर त्यांचा बंगला सरकारने प्रणव मुखर्जी यांना देऊ केलेला होता; पण मुखर्जींनी तो नाकारला आणि मुख्यतः सुरक्षा संस्थांनीदेखील सुरक्षेच्या कारणास्तव हा अत्यंत गजबजलेल्या रस्त्यावर असलेला बंगला मुखर्जी यांच्या वास्तव्यासाठी उचित नसल्याचे सांगून नाकारला होता.
आता ताज्या माहितीनुसार मुखर्जी यांनी 10 राजाजी मार्गावरील या बंगल्याबाबतही काहीशी प्रतिकूलता दर्शविल्याचे समजते.
त्यांनी सरकारला 13 तालकटोरा मार्ग येथील त्यांच्या पूर्वीच्या निवासस्थानासाठी पसंती कळविली असल्याचे समजते. राष्ट्रपती होण्यापूर्वी मुखर्जी हे याच बंगल्यात राहात होते. या बंगल्यात ते जवळपास पंचवीस ते तीस वर्षे राहात होते. त्यांच्या निकटवर्तीयांच्या सांगण्यानुसार हा बंगला किंवा ही वास्तू त्यांच्यादृष्टीने खूप शुभशकुनी ठरलेली आहे. या वास्तूशी निगडित त्यांच्या अनेक स्मृती आहेत व त्यामुळेच त्यांना त्यांचे निवृत्त जीवन पुन्हा या जुन्याच वास्तूमध्ये व्यतीत करण्याची इच्छा आहे.
तशी अडचण काही नाही. आताही हा बंगला एका अर्थाने मुखर्जी यांच्याच ताब्यात असल्यासारखा आहे. मुखर्जी यांचे चिरंजीव अभिजित यांचे या बंगल्यात वास्तव्य आहे. अभिजित हे जांगीपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत. त्यामुळे या बंगल्यात पुन्हा वास्तव्य करण्यास प्रणवदादांना तशी फारशी अडचण येऊ नये!
पण हा बंगला अगदी गजबजलेल्या रस्त्यावर आणि ऐन चौकात आहे. त्यामुळे सुरक्षा संस्थांना त्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात. परंतु प्रणवदा फारच आग्रही राहिल्यास सरकारला विचार करावा लागेल!
आता घराचाच विषय निघालाय म्हणून आणखी एका घराची कथा सांगण्याचा मोह आवरणे कठीण आहे!
आपले कविमनाचे व घडीघडी कविता करून कवितेतूनच बोलणारे रामदास आठवले!
कॉंग्रेसची साथ सोडून भाजप-शिवसेनेचा हात पकडून ते राज्यसभेत यशस्विरीत्या पोचले. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्रीदेखील झाले. पण बिचाऱ्यांना अद्याप साधे एक घर मिळू शकलेले नाही. राज्यसभेत येऊन त्यांची तीन वर्षे झाली म्हणजेच निम्मी मुदत तर संपली; पण अद्याप ते "बेघर'च आहेत.
आता आठवले यांनी यावर एक कविता करावी!
तिसरी कहाणी!
कपिल सिब्बल हे माजी केंद्रीय मंत्री! ते राज्यसभेवर निवडून आले आहेत. त्यांनाही वर्षाचा काळ होत आला आहे; पण अद्याप त्यांना घर देऊ करण्यात आलेले नाही. ते जोरबाग परिसरात भाड्याच्या घरात राहतात.
त्यांच्या निकटवर्तीयांच्या म्हणण्यानुसार काही केंद्रीय मंत्री त्यांना घर मिळू न देण्यामागे आहेत!
काहीही असो, वर्तमान राजवटीत सूडबुद्धीचे राजकारण तेजीत असल्याचे दिसून येते. सिब्बल हे त्यांच्या आक्रमक भाजपविरोधी भूमिकेबद्दल प्रसिद्ध आहेत. सरकारविरोधी अनेक न्यायालयीन प्रकरणात ते वकील या नात्याने युक्तिवाद करीत असतात. त्याची शिक्षा बहुधा त्यांना मिळत असावी!
जय हो!
-----------------------


 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: