Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 

आता मानसिकता बदलू
ऋता बावडेकर
Monday, May 15, 2017 AT 12:00 AM (IST)
आता मानसिकता बदलू

गेल्या काही दिवसांत महिलांवरील अत्याचारांसंदर्भात महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिले. बिल्कीस बानो, निर्भया, नयना पुजारी यांच्यासंदर्भातील हे निकाल आहेत. या निकालांमुळे एका क्षणात परिस्थिती बदलेल असा भाबडा विश्‍वास नसला, तरी महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे निकाल खरोखरच महत्त्वाचे आहेत. एका घटनेत फाशी, एकात जन्मठेप तर एका घटनेत .... अशा शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत.
गुजरातमध्ये 2002 मध्ये गोधरा येथे दंगल उसळली होती. अहमदाबादजवळच्या रांधीपूर गावात 3 मार्चला बिल्कीसच्या घरावर काहींनी हल्ला केला. गर्भवती बिल्कीसवर सामूहिक बलात्कार करून तिच्या घरातील सात जणांची हत्या करण्यात आली होती. ती त्यावेळी 19 वर्षांची आणि पाच महिन्यांची गर्भवती होती. या अत्याचारात ती मेली असे समजून आरोपी निघून गेले होते. सीबीआयने 13 आरोपींना अटक केली होती. 15 वर्षांपूर्वीच्या या खटल्यात सत्र न्यायालयाने 12 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची ही शिक्षा कायम केली. तसेच पाच पोलिस आणि दोन डॉक्‍टरांनाही न्यायालयाने दोषी ठरवले आहे. एका आरोपीचे निधन झाले आहे. या निकालाबाबत बिल्कीस बानोने समाधान व्यक्त केले आहे. "जे कष्ट आणि मानहानी मी आणि माझ्या कुटुंबाने एवढी वर्षे सहन केली, त्यातून थोडासा दिलासा मिळाला आहे,' अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत.

दिल्लीत 16 डिसेंबर 2012 रोजी माणुसकीला काळिमा फासणारे प्रकरण घडले. संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल नुकताच लागला. या प्रकरणातील चारही आरोपींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली. यातील एका आरोपीचे आधीच निधन झाले आहे, तर अल्पवयीन म्हणून एका आरोपीची सुटका करण्यात आली आहे. निर्भया या प्रकरणात निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने खूप महत्त्वपूर्ण निवेदन केले आहे. सर्वोच्च न्यायालय म्हणते - एखाद्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली जात असेल, तर त्या गुन्ह्याचे स्वरूप, पद्धती, त्यामुळे सामाजिक विश्‍वासाला गेलेला तडा आणि दुर्मिळातील दुर्मिळ कृत्य या सर्व बाबींचा विचार केलेला असतो. गुन्ह्याची पद्धत पाहता ही दुसऱ्या कोणत्या तरी जगातील गोष्ट वाटते. या प्रकरणात दयेच्या भावनेपेक्षा क्रोधाची भावना अधिक तीव्र आहे. अतिशय क्रूर आणि पाशवी पद्धतीने हा अत्याचार करण्यात आला. पुरावे नष्ट करण्यासाठी पीडित तरुणी आणि तिच्या मित्राला बसमधून फेकण्यात आले. ठार मारण्यासाठी त्यांच्या अंगावर बस घालण्याचा प्रयत्न करण्यात आला, हे सहन करता येणारे नाही.

पुण्यातील संगणक अभियंता नयना पुजारी यांच्यावर बलात्कार करून त्यांचा खून करणाऱ्या तिघांना विशेष न्यायाधीशांनी दोषी ठरविले आहे. ... सात वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला. यातील एक जण माफीचा साक्षीदार बनला. नयना पुजारी ही 8 ऑगस्ट 2009 रोजी काम संपवून घरी जाण्यासाठी रात्री खराडी बायपास झेन्सॉर कंपनीजवळ उभी होती. कॅबचालक योगेश अशोक राऊत याने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिला कॅबमध्ये बसवले व निर्जनस्थळी नेले. तेथे त्याने आणि त्याच्या तीन मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर ओढणीने गळा आवळून दगडाने ठेचून तिचा खून केला. तिचा मृतदेह राजगुरुनगरजवळील जरेवाडी येथे सापडला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश पोलिसांना चकवा देऊन पळून गेला होता. त्यावेळी पोलिसांना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागले. दरम्यान काही दिवसांनी त्याला शिर्डी येथून पुन्हा अटक करण्यात आली.

माणुसकीवरचा विश्‍वास उडावा अशा या घटना आहेत. यात या महिलांचा काय दोष? तसे बघितले तर अत्याचारांच्या कोणत्याच घटनांत महिलांचा कधीच काही दोष नसतो. पण या महिलांचे कपडे, वागणे याला जबाबदार असते असे "पुरुषी मानसिकते'चे (पुरुषांचे नव्हे) म्हणणे असते. त्यामुळे अशा प्रकरणांना महिलाच दोषी, असा सरळ अर्थ काढून न्यायनिवाडा देऊन ते मोकळे होतात. निर्भया प्रकरणातील एका आरोपीचेही हेच म्हणणे होते, की बाई असून ती इतक्‍या रात्री का फिरत होती? त्यामुळे आम्ही तिला धडा शिकवला... हे त्यांनी कोणत्या अधिकारात केले, असा प्रश्‍न विचारणेच फजूल ठरेल, कारण पुरुषाला विशेषाधिकार असतात असे त्याचे व त्याच्यासारख्या मानसिकतेच्या समाजाचे म्हणणे असते. या मानसिकतेनेच आपले नुकसान केले आहे. स्वतःमध्ये काही पात्रता नसते, पण एखादी मुलगी (स्त्री) आपल्यापेक्षा उजवी आहे, पुढे जाते आहे, हे या मानसिकतेला रुचत नाही - पटत नाही. मग तिला अशा प्रकारे "धडा' शिकवला जातो. स्त्रीच्या चारित्र्यालाही आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे अशा अत्याचारांनंतर तिलाच दोषी ठरवण्यात येते. समाजाकडून हीन वागणूक मिळते. काहीही दोष तिला नसताना खाली मान घालून वावरावे लागते किंवा घरात कोंडून घ्यावे लागते किंवा आयुष्यच संपवावे लागते. महत्त्वाचे म्हणजे तिला अशी वागणूक देणाऱ्यांत स्त्रियाही(च) पुढे असतात. वास्तविक, तिचे मन त्यांना समजायला हवे. यात तिचा काही दोष नाही हे त्यांनाही समजत असते, पण परत मानसिकता! कारण तिची प्रगती किंवा ती स्वतः त्यांना खटकत असते. तसेच मुलीला नावे ठेवणे सगळ्यात सोपे असते. हे किती दिवस चालणार? कधी तरी थांबायला हवे. निकाल देऊन न्यायालयाने आपले काम केले आहे. आता आपली मानसिकता बदलण्याचे काम समाजाने करायला हवे. तसे होईल तो सुदिन.


 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: