Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 

एमबीए ः प्रवेशपरीक्षांचा गाभा
डॉ. श्रीराम गीत
Monday, May 15, 2017 AT 12:00 AM (IST)
एमबीए: प्रवेशपरीक्षांचा गाभा


मास्टर्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन अथवा एमबीए संदर्भात प्रवेश परीक्षा, त्यातली स्पर्धा, पदवीसाठी फर्स्टक्‍लासची गरज अशा प्राथमिक गोष्टीतला संभ्रम मागच्या लेखात (6 मे 2017) आपण पाहिला आहे. आता विविध प्रवेश परीक्षा जरी असल्या, तरी त्यांचा गाभा कसा असतो, ते समजून घेऊयात. एमबीएसाठी कोणताही पदवीधर प्रवेश घेऊ शकता हे आपण पाहिलेच. अर्थात याचा अर्थ विविध पदव्यांमधील समाईक घटक लक्षात घेऊन ही परीक्षा घेतली जाते. म्हणजेच अगदी डॉक्‍टर, इंजिनिअरपासून आर्टस कॉमर्स पदवीधरापर्यंत सारेच पदवीधर विविध अभ्यासक्रम पूर्ण करतात, पण एमबीएला एकत्र अभ्यास करतात तर यांच्यामध्ये समाईक काय?
- इयत्ता दहावीचे गणित हे सर्वांनाच असते.
- पदवीसाठीच्या इंग्रजीची पातळी सहसा एकच असते. निदान तसे गृहीत धरले जाते.
- सामान्य ज्ञान, सामान्य आकलनक्षमता व तर्कविचारक्षमता या गोष्टी कोणत्याही पदवी दरम्यान त्या-त्या विषयांतून वाढवायच्या असतात. त्यांचा वापर नंतर समोर येणाऱ्या प्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी वापरायचा असतो.
म्हणून राज्यपातळीवरच्या सीईटीपासून अत्यंत कठीण अशा कॅटपर्यंत प्रत्येक प्रवेशपरीक्षेसाठी याच गोष्टींचा विचार करून प्रश्‍नपत्रिकेचे सेक्‍शन्स बनतात. मग याला जरी विविध नावांनी संबोधले तरी मूळ गाभा तोच राहतो.
क्वांटिटेटिव्ह सेक्‍शनमधे गणिती तर डाटा इंटरप्रिटेशनमध्ये विविध संस्था व माहिती यातून अर्थ काढणे असा प्रकार राहतो. व्हर्बलमधे भाषा, व्याकरण उताऱ्याचे वाचन करून त्यावरील प्रश्‍नांची उत्तरे असा अगदी सोपा वाटणारा पण मस्त चकवणारा प्रकार असतो. वरवर पाहता अगदी साध्या साध्या दिसणाऱ्या प्रश्‍नांमधे तुमची क्‍लीन बोल्ड विकेट घेण्याची क्षमता असते.
मुख्य म्हणजे "कॅट'सारख्या परीक्षेत प्रत्येक सेक्‍शनमधे किमान गुण किती हवेत हे दरवेळी नव्याने ठरवले जाऊ शकते. काही परीक्षांत चुकीच्या उत्तरांचे मार्क कापले जातात. काही परीक्षा फक्त ऑनलाइन आहेत, तर काही फक्त पेपर पेन्सिलनेच द्यायच्या असतात.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या परीक्षांमध्ये सहसा परीक्षेची एकूण वेळ मिनिटांमध्ये जर लक्षात घेतली तर त्याच्या 1/3 किंवा 1/2 इतकी प्रश्‍नांची उत्तरे द्यायची असतात. कॅटची परीक्षा स्वतःचे स्वरूप दरवर्षी बदलत असते, त्यामुळेच ती सर्वांत कठीण परीक्षा ठरते.

-----------------------------------------------------

चौकट

या लेखात परीक्षेबद्दलचे एकूण मार्क, त्याचे नियम, सेक्‍शन्सचे तांत्रिक प्रकार याची माहिती फक्त ढोबळ स्वरूपात आहे. ज्याने त्याने निवडलेल्या परीक्षेची साद्यंत माहिती घेणे महत्त्वाचे आहे.

----------------------------------------------------------------

तीव्र स्पर्धेची नेमकी कल्पना येण्यासाठी ः
मोठ्या शहरांत "कॅट'ची तयारी करून घेणारे अनेक नामवंत क्‍लासेस आहेत. सहसा पदवीच्या शेवटच्या वर्षाला जाणारे अनेकजण एमबीए करायचे मनात आल्यास त्यांची चौकशी करून लगेच "कॅट'चा क्‍लास लावून टाकतात. सहसा जुलै ते ऑक्‍टोबर दरम्यान "कॅट'चा क्‍लास अटेंड करण्यात छान वेळ जातो. मग नोव्हेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात "कॅट'ची परीक्षा होते. शंभरातील चाळीस टक्‍क्‍यांना पेपरच कळलेला नसतो, चाळीस टक्के पेपराशी झुंजून धारातीर्थी पडतात, दहा टक्के फार फार तर वीस ते तीस टक्के मार्क मिळवण्यात कसेबसे यशस्वी होतात. उरलेल्या दहा टक्‍क्‍यांपैकी नऊ टक्के पुढच्या वर्षीच्या तयारीला लागतात, तर एक टक्का फारतर ग्रुपडिस्कशनपर्यंत पोचतात.
- आईवडिलांचे पंचवीस हजार रुपये व पदवीच्या शेवटच्या वर्षाची मोलाची अडीचशे ते तीनशे तासांची अभ्यासाची मात्र वाट लागलेली असते.
- इयत्ता बारावीनंतरची जेईईची परीक्षा खूप कठीण मानली जाते. ही यशस्वीरीत्या पार पाडलेली सारीच्या सारी विद्यार्थीसंख्या म्हणजेच आख्खी आयआयटी सहसा "कॅटला' बसते. मात्र तिथेही कसेबसे चाळीस टक्केच ग्रुपडिस्कशनला पोचतात.
- आयआयटी पास व आयआयएम विभूषित पदवीधराला गेली पन्नास वर्षे "डबल बॅरल पदवीधर' असे कौतुकाने संबोधले जाते. मात्र माझे आयआयएम हुकले ही सल अनेक आयआयटी पदवीधरांची असते.
- अर्थातच इतक्‍या तीव्र स्पर्धेत आपण कुठे आहोत, हे नीट तपासून पाहिले, तर विनाकारण मानसिक खच्चीकरण टळते, यासाठीचा हा उल्लेख आहे. या संभ्रमातून बाहेर येणे ही सध्याच्या काळाची एक मोलाची गरज बनत चालली आहे. क्‍लास लावला म्हणजे, पैसे खर्चले म्हणजे हवे ते मिळते, असे इथे कधीच घडत नाही.
- मात्र स्पर्धा समजून घेत, नोकरी करताना चिकाटीने पुन्हा पुन्हा परीक्षा देणारे वयाच्या तेवीस-चोविसाव्या वर्षी तिसऱ्या प्रयत्ना यश मिळवतात. यासाठी एक सोपे गणित लक्षात घ्या. तीन वर्षांत त्यांचा एक हजार तास.
- रोज फक्त एकच तास - "कॅट'चा अभ्यास व सराव झालेला असतो.
- याउलट पदवीनंतर कोणतीही नोकरी न स्वीकारता, फक्त अभ्यास करणारे योग्य संस्था न मिळाल्यास तोंडघशी पडतात. कारण पुढची दोन वर्षे पास झालेले पदवीधर हेच नोकरीसाठी लायक समजले जातात. जुने पदवीधर गंजलेले मानतात हे विद्यार्थी व पालकांनी लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
- विशेषतः इंडस्ट्रीबद्दल सविस्तर माहिती नसलेल्या पण सधन मध्यमवर्गातील पालकांना आपल्या मुलामुलींनी फक्त शिकावे, नीट अभ्यास करावा, खूप तयार करून परीक्षेची तयारी करावी अशी भाबडी समजूत मनात असते. म्हणून आवर्जून हा उल्लेख.
एमबीएला प्रवेश घेण्यापूर्वीची किमान चौकशी कोणती?
मोठ्ठी जाहिरात देणारी संस्था, मोठ्ठी इमारत, चकचकीत माहितीपत्रक यावर भुलून न जाता सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अखिल भारतीय तांत्रिकी परिषदेची (A & CTE) न्यता असलेली मॅनेजमेंट संस्था आहे याची खात्री करणे हे फार महत्त्वाचे ठरते. दुसरी गोष्ट म्हणजे, पहिल्या तीन विद्यार्थ्यांच्या पॅकेजचा, त्यांना मिळालेल्या पगाराचा व नोकऱ्यांचा उेल्लख फक्त केला जातो. याऐवजी सरासरी पॅकेज कितीचे व किती कंपन्या कॅंपससाठी आल्या होत्या, याची नेमकी माहिती नोकरी न मिळालेल्या कोणत्याही विद्यार्थ्याकडून नक्की मिळते. दोन आकड्यांत प्रचंड तफावत असतेच असते. पहिल्या तिघांना कदाचित दहा लाखांचे पॅकेज असले तर सरासरी पॅकेज जेमतेम दोन लाखांचे म्हणजे फक्त पंधरा-सोळा हजार रुपये महिना पगाराचे असू शकते. भरमसाठ संस्था, घसरलेला दर्जा यामुळे ही स्थिती अनेकांवर आली आहे. याहीपुढे जाऊन 2016 व 2017 मध्ये जवळपास साठ टक्के एमबीए पदवीधर नोकरीच्या शोधात आहेत. 2016 मध्ये अनेक संस्थांच्या जागाही रिकाम्या राहिल्या होत्या, हे एक प्रखर वास्तव लक्षात घेऊन 2017 ला प्रवेश घ्यावा.

खऱ्या एमबीएचे आधारभूत विषय ः
पहिले वर्ष सर्वच विद्यार्थी सारखेच विषय शिकतात. मात्र दुसऱ्या वर्षी फायनान्स, मार्केटिंग. एचआर, ऑपरेशन्स अशा चार प्रमुख विषयातून निवड करावी लागते. सहसा सुमारे साठ टक्‍क्‍यांची मार्केटिंगची निवड असते. इंजिनिअर्स अनेकदा ऑपरेशन्स निवडतात. फायनान्स हे साऱ्यांचे आकर्षण असते, पण तो विषय घेऊन प्रगती करणे हे फार मोजक्‍यांना झेपते. एचआर म्हणजे मनुष्यबळविकास यामध्ये कायमच चढउतार होत असतात. मात्र आयटीमुळे या विषयाला गेली पंधरा वर्षे मागणी राहिलेली आहे. विषय निवड करण्यासाठी संस्थेचे प्राध्यापक नक्की मदत करतात. याउलट मला हेच करायचे आहे असे म्हणणारे विद्यार्थी आकर्षण म्हणून तसे म्हणत राहतात. स्वतःची पर्सनॅलिटी व कामाची गरज याची सांगड घालून हा निर्णय दुसऱ्या वर्षात घेतलेला उपयुक्त ठरतो. तोवर विविध विषयांचा किमान अभ्यास झालेला असतो. त्यातही थोडक्‍यात सांगायचे, तर अर्थशास्त्र व कॉमर्सची आवड असेल तर फायनान्सचा विचार ठीक. मार्केटिंगसाठी पर्सनॅलिटीचा विचार सर्वांत महत्त्वाचा. एचआरसाठी सायकॉलॉजी व माणसांशी आंतरसंबंध समजून घेण्याची गरज लागते. उत्पादनसाखळीचा विचार ऑपरेशन्समध्ये येतो. आपल्या मूळ पदवीला, अभ्यासाला, आवडीला अनुसरून ही निवड विद्यार्थी दुसऱ्या वर्षात नक्की करू शकतो. मात्र त्या क्षेत्रातील काम करणारे व आपले प्राध्यापक यांचा सल्ला अत्यंत उपयुक्त ठरतो. स्वतःच्या ठाम समजुतीला याची जोड देणे गरजेचे राहते.

स्पेशल विषयातले एमबीए अभ्यासक्रम ः
एमबीए इन, म्हणून सध्या पुढील अभ्यासक्रम आहेत.
आयटी, टेलिकॉम, बायोटेक्‍नॉलॉजी, इंपोर्ट एक्‍पोर्ट, इंटरनॅशनल बिझनेस, हॉस्पिटॅलिटी, हॉस्पिटल मॅनेजमेंट, हेल्थकेअर, ट्रॅव्हल अँड टुरिझम वगैरे सहज डोळ्यासमोर येणारी ही यादी आहे.
खरे तर मूळ पदवी त्याच विषयातली असून, त्यातील पदव्युत्तर अभ्यास मॅनेजमेंटच्या अंगाने विस्ताराने शिकून त्याच क्षेत्रात जाण्यासाठीचे हे अभ्यासक्रम आहेत, हे लक्षात घ्यावे. अनेकदा आयटीमधील पदवी घेऊन योग्य नोकरी न मिळाल्यास एमबीए आयटी उपयुक्त ठरेल. तीच गोष्ट इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड टेलिकॉम पास झाल्यावरची आहे. त्याने टेलिकॉम मॅनेजमेंट केल्यास उपयोग होईल. मात्र मुळात मॅनेजमेंटची क्षमता आहे वा नाही हाच मुद्दा यानंतर महत्त्वाचा ठरतो. ती असली तर सर्वसामान्य एमबीए पदवीधर या साऱ्या क्षेत्रांत जास्त कार्यक्षमतेने काम करू शकतो हे लक्षात ठेवावे.
दुधाची तहान ताकावर भागवणे अशी एक म्हण मराठीत आहे. तसाच थोडासा प्रकार या अन्य प्रकारात घडतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सामान्य एमबीए कोणत्याही इंडस्ट्रीत, व्यवसायात सहज शिरू शकतो. याउलट इथे फक्त आपल्या विषयातच आपण आयुष्यभर काम करत राहतो. शेवटी एमबीएची पदवी म्हणजे जादुकी झप्पी नव्हे. जादूगाराचे कसब त्या झप्पीत जेव्हा ओतले जाते, तेव्हाच त्या पदवीला महत्त्व येते. अशा जादूगारालाच इंडस्ट्रीत यशस्वी मॅनेजर समजतात ना?


 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: