Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 

मजाराम आणि कला
मृणालिनी वनारसे
Monday, May 15, 2017 AT 12:00 AM (IST)


मजाराम आणि कला

मित्रहो, आपण कलानिर्मिती आणि कलानुभव यांच्याबाबत बोलत होतो. कला प्रांतात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रवेशानंतर निर्मिती, त्यामागची प्रेरणा, कलाकृतीचा अस्सलपणा याबाबतीत अनेक प्रश्‍नचिन्हे उभी राहिली. निर्मितीच्या नाही, तरी अनुभव घेण्याच्या अंगाने आपण आपली सजगता, संवेदनशीलता जोपासत राहू शकतो अशी एक प्रतिक्रिया मला वाचकांकडून मिळाली. त्याच अनुषंगाने आता पुढील कलाचिकित्सा योजली आहे. सुरवात अगदी सुरवातीपासून करू. माणूस आणि कला यांचे नाते काय?
"बुद्ध केव्हापासून आहे?' एकदा एका झेन गुरूने विचारलं.
"जेव्हापासून मी आहे भगवन,' शिष्याने सांगितलं.
"छान.. आणि तू केव्हापासून आहेस?'
"जेव्हापासून बुद्ध आहे, भगवन.'
ही झेन शिकवण आताचे कला-विचारवंत "माणूस आणि कला' यांच्या नात्याबद्दल वापरतात. कला केव्हापासून आहे? जेव्हापासून माणूस आहे.. आणि माणूस केव्हापासून आहे? जेव्हापासून कला आहे. माणूस आणि त्याची सौंदर्यदृष्टी एकमेकांची सोबत केव्हापासून करताहेत याचा कोणता दिवस, मुहूर्त सांगावा?
भीमबेटकाच्या गुंफांमध्ये आज माणसाचे अन्य भौतिक पुरावे कदाचित सापडणार नाहीत. त्याचे सांगाडे, त्याची भांडीकुंडी सारे काही तिथल्या मातीत विलीन झाले असू दे. तरीही तिथे माणूस कधी होता की नव्हता ही शंका आपल्या मनात येणार नाही कारण त्याने काढलेली चित्रे आपली आजही सोबत करताहेत. त्या प्राचीन शैलचित्रांमध्ये एक गवा (किंवा तत्सम मोठा प्राणी आहे) आहे. त्याच्या पुढे एक मनुष्याकृती आहे. गवा अवाढव्य. मनुष्य किरकोळ, त्या विक्राळ प्राण्यासमोर अगदी मुंगीएवढा! खरोखर जर माणूस आणि गवा एकमेकांसमोर उभे राहिले, तर एकमेकांच्या तुलनेत असे दिसतील? पण हे यथातथ्य नसून यथादृश्‍य चित्र आहे. तो गवा माणसाला, विशेषतः ज्याच्या मागे तो लागलाय त्या माणसाला केवढा भासतो; त्या अवाढव्य धुडासमोर त्याचा किरकोळ देह त्याला कसा प्रतीत होतो, हे त्या आदिम माणसाचे "पाहणे' आपण पाहतो. गव्याचा जोम आणि माणसाचे धूम ठोकणे यातील त्या प्राचीन चित्रकाराला दिसलेली गंमत आपण पाहतो. त्याला सापडलेला तो क्षण आपण जगतो. आपण चित्राला ओळखतो, आपण त्या आदिम चित्रकाराच्या नजरेला ओळखतो. हीच खूण आहे आपण आणि तो (आदिम माणूस) यांच्यातल्या समान धाग्याची. इथे खरेच माणूस कधी होता की नव्हता? होता, नक्कीच होता.
त्या आदिम चित्रकाराचे पाहणे काही फक्त भारतीय माणसाला समजते असे नाही. जगभरातील माणसांना समजते. त्यासाठीच तर भीमबेटका, अल्तामिरा, लास्को अशा प्राचीन गुंफा या माणसासाठी वारसास्थळे बनलेली आहेत. हा काही फक्त एका देशाचा, समूहाचा वारसा नाही. हा मानवजातीचा वारसा आहे. ही "नजर', हे पाहणे आपल्याला वारश्‍यात मिळाले आहे. जसे चालणारे पाय मिळालेत, वळणारा अंगठा मिळालाय तसेच "पाहणारी' नजरदेखील मिळाली आहे. (पाहणे म्हणजे अनुभवणे या अर्थाने. पाहणे म्हणजे फक्त डोळ्यांनी पाहणे नव्हे) स्टीव्हन पिंकर, डेनिस डटनसारखे विचारवंत किंवा फ्रेडरिक फ्रॅंकसारखा चित्रकार यांना तरी असेच वाटते. त्यांची ओळख आपण करून घेऊ. कला आणि माणूस यांच्यातील नाते समजावून घेताना या विचारवंतांची मदत आपल्याला फार उपयुक्त ठरेल. सुरवात फ्रेडरिक फ्रॅंक यांच्यापासून करू.
फ्रेडरिक फ्रॅंक हे नेदरलॅंड येथे जन्मलेले आणि अमेरिकास्थित चित्रकार, शिल्पकार होते. माणूस आणि कला यांच्यातील संबंध हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता. या कामी बौद्धविचार त्यांना फार मोलाचा वाटत असे. आपण ज्या "पाहण्या'विषयी बोलतो आहोत, त्याविषयी तर फ्रॅंक यांनी खूपच चिंतन केले आहे. इंग्रजीमध्ये "लुकिंग ऍट' आणि "सीइंग' या दोन क्रियापदांनी त्यांनी केवळ बघणे आणि पाहणे यातील फरक स्पष्ट केला आहे. आपल्याला रोज ढीगभर गोष्टी दिसत असतात. आपण त्यातील काही खऱ्या अर्थाने "पाहतो' किंवा पाहात नाही. हळूहळू आपण पाहणे विसरत जातो. पाहण्याऐवजी नजर टाकणे सुरू होते. या न पाहण्याविषयी फ्रॅंक आपल्याला सजग राहायला सुचवतात. आपले पाहणे (जाणणे अशा अर्थाने) संपले तर आपले माणूसपण राहील काय? आणि तरीही कितीवेळा, खरेच कितीवेळा, आपण नुसती नजर न टाकता पाहतो? प्रत्येक माणसात दडलेल्या त्या आदिम नजरेला फ्रॅंक यांचे आवाहन आहे.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पाहण्याला आणि त्यातून जे उमटते त्याला फ्रॅंक काही फार असामान्य समजत नाहीत. टाकाऊही समजत नाहीत. माणसाचा निसर्गदत्त गुणधर्म एवढे मात्र समजतात. कला असे म्हटले, की अनेकांना ही "अपने बस की बात नही' असे वाटत असते. याचे कारण कलाकार, कलाकृती आणि आस्वादन या सर्वाला समाजाने मखरात बसवलेले असते. ते "पाहण्या'पासून आणि पाहण्याला स्वाभाविक प्रतिक्रिया देण्यापासून इतके लांब गेलेले असते, की ते "आपले' नाही असे अनेकांना वाटत असते. कलाकार, त्यांची संवेदनशीलता, त्यांचे कलेला वाहून घेणे, त्यासाठी अनेकदा तडफडणे, आपल्यापासून वेगळ्याच उंचीवरील त्यांचे कौशल्य जोपासणे, या सगळ्याचे आपल्या मनात एक स्थान असते. कलाकाराने आपली कला जोपासावी यासाठी त्याला पोसण्याची जबाबदारी अनेक व्यक्ती, संस्थांना वाटत असते. पूर्वीही राजे-रजवाडे हे करत असत. कला-कलाकार असे म्हटले, की अनेकदा सामान्य माणसाच्या मनात या साऱ्या प्रतिमा तरळून जातात. यातील तडफड नशिबी नको म्हणून अनेक आईवडील आपल्या मुलांना "कलेच्या' दिशेने जाण्यापासून रोखतात. फ्रॅंक या साऱ्या व्यवहाराबद्दल असे म्हणतात, की हे सर्व आपल्यातूनच उत्पन्न झाले आहे आणि तरीही "पाहण्याचा' जो आदिम वारसा आपल्याला लाभला आहे, त्याचा या सगळ्याशी नेमका किती संबंध आहे? प्रत्येक जन्मलेल्या माणसाच्या दृष्टीने या वारश्‍याला अधिक महत्त्व आहे की कलेच्या नावाने नंतर उत्पन्न झालेल्या या सगळ्या मानीव आणि भौतिक पसाऱ्याला? या सामुदायिक कला जगतात कलेची उच्च शिखरे निर्माण होतात, त्या भोवती अर्थकारण फिरते, त्याच्या परंपरा निर्माण होतात, लयाला जातात, इत्यादी इत्यादी. आजवरच्या सर्व "प्रगत' समाजात हे घडले आहे आणि घडते आहे. फ्रॅंक यांच्या मताने ही सगळी सामाजिक घटिते आहेत. व्यक्तीने या सगळ्याच्या पलीकडचे आपले "पाहणे' पाहिले पाहिजे, जोपासले पाहिजे. कारण ती त्याच्या असण्याची, माणूसपणाची खूण आहे.
कोणी म्हणेल, असेच असेल, पाहणे हा मानवी स्वभाव असेल तर त्याची आठवण तरी का करून द्यावी लागावी? उत्तर आपल्यापाशीच आहे. आपल्याला मिळालेला आणि वापरात नसलेला हा काही एकमेव वारसा नाही. चालण्याचे उदाहरण घेऊ. आपल्या प्रजातीची शास्त्रीय व्याख्या दोन पायांवर चालणारा प्राणी अशी आहे (bipedal being) आणि तरीही आज आपल्याला "चाला' असा सल्ला फी भरून अथवा फुकट मिळतच असतो. कारण आपण "चालणे' विसरतो. त्याचा आपल्या शरीर-मनावर परिणाम होतो. आता जेव्हा माणसे हरवलेली गोष्ट सापडल्याप्रमाणे जेव्हा चालायला सुरवात करतात तेव्हा काय काय करतात? जरा संध्याकाळी, रस्ते, बागा, टेकड्या बघितले म्हणजे माणसांनी चालण्याचे काय काय करून ठेवले आहे हे कळते. कुणी व्यायामाचे आखूड/लांब, देशी/विदेशी कपडे, बूट घालून, पेडोमीटर लावून चालत असते. तर कुणी हातात सामान घेऊन, चालण्याला अत्यंत गैरसोयीचे कपडे, घालून कसेबसे पाय ओढत चालत असते. व्यायामाविषयी माझी ना नाही. मुद्दा रमतगमत चालण्याचा आहे. त्याची गरज नाही असे तर आपण नाही ना ठरवलेले?
परवाच मला एक पंधरा-सोळा वर्षांची मुलगी भेटली. पुण्यात पहिल्यांदा आली होती ती. छोट्या शहरात राहते. तिला घेऊन मी संध्याकाळी पर्वती बघायला गेले होते. तर चालणे सुरू करण्यापूर्वी ती म्हणाली, "दाणे! दाणे हातात असतील तर चालायला मजा येईल ना?' मला त्या छोट्याशा अनुभवाने असे वाटले, ही मुलगी काही कॅलरी जाळायला, घड्याळ लावून चालायला आलेली नाही. तिला चालण्यात मजा घ्यायची आहे. हा मजा येण्याचा भाग चालण्यात किती बरे महत्त्वाचा आहे. मजेत चालणे. व्यायामाचे ओझे नाही, घाई नाही, गैरसोयीचा पेहराव नाही अशा प्रसंगी दाणे खात अथवा तसेच, शीळ वाजवत अथवा नुसतेच हिंडायला मजा आहे.. आणि मजा येणे हा ही आपल्या नैसर्गिक स्वभावाचा भाग आहे.
उत्क्रांतीच्या इतिहासात आपण दोन पायावर चालणे पत्करले (म्हणजे तसे करू शकणारे पूर्वज जगले) याची विशेष कारणे आहेत. चार पायांवर चालताना जसे "दिसते' त्यापेक्षा दोन पायांवर उभे राहून वेगळे "दिसते.' हे पाहणे काही हे अन्न, हा शत्रू, खाण्यासाठी धावा अथवा शत्रूपासून पळा एवढ्याच क्रियांना प्रेरणा देणारे नव्हते. आपले "पाहणे' ही फार गुंतागुंतीची गोष्ट आहे. विज्ञानाचा तो एक लाडका विषय आहे. म्हटले तर प्रत्येक माणसाला उपलब्ध असणारी आणि म्हटले तर अतिशय दुर्मिळ अशी ही गोष्ट आहे. चालतात सगळेच. (म्हणजे ज्यांना शारीरिकदृष्ट्या ते अशक्‍य आहे अशी माणसे सोडून. सर्वसाधारणपणे सगळ्यांना चालणे न शिकवता येते असा अर्थ) आणि तरीही या सर्वसामान्य गुणातून आपण असामान्यत्व शोधतो. आपण पार जागतिक स्तरावर चालण्याच्या स्पर्धा घेतो. त्यात पहिले येणाऱ्याला बक्षीस देतो. या स्पर्धांना मोठे मोठे उद्योग अर्थपुरवठा करतात. त्याच्याभोवती बरेच अर्थकारण फिरते.. आणि तरीही त्यात कोण पहिला येईल यावर आपण आपले चालणे ठेवत नाही. त्याच्या चालीशी आपली चाल जुळवूनही घेत नाही. तर आपण आपल्या चालीने चालतो. राजहंसाचे चालणे वगैरे आपण तिथे म्हणत नाही. आपण आपल्या पद्धतीने चालतो. चालण्याचा अनुभव आणि परिणाम हरेक माणसावर निराळा. चालणे ही क्रिया मात्र सगळ्यांना आत्मगत.
"पाहण्याचे' काय? तिथे जर काही शब्दातीत वेगळं घडत असेल. तर त्यासाठी आपल्या रोजच्या जगण्यात स्थान काय? फ्रेडरिक फ्रॅंक आपले लक्ष नेमके याकडेच वळवताहेत. त्यांचे "झेन सीइंग झेन ड्रॉइंग' हे पुस्तक माझ्या हातात आलं आणि विशेषतः चित्रकारितेविषयी असणारे भयगंड दूर होत असल्यासारखे वाटले. किती साध्या पातळीवर आणून ठेवले आहे या माणसाने चित्रकलेला. साधे म्हणजे सामान्य नव्हे. साधे म्हणजे प्रत्येक माणसाकडे हे "पाहण्याचे' कौशल्य आहे असा विश्‍वास देणारे. या पाहण्याला, त्यातून जे उमटेल त्याला, सामाजिक कला-विश्‍वात कोणती जागा असेल नसेल याची क्षिती नाही. पाहण्याचा आणि जे झिरपेल त्याला आपल्यातून वाहू देण्याचा मनःपूत आनंद आपण घेऊ शकतो याची आठवण करून देणारे हे पुस्तक आहे. एक गोष्ट आवर्जून नमूद केली पाहिजे, फ्रॅंक काही कलेच्या प्रांतातील शिखरांना नाकारत नाहीत. ते फक्त एवढेच म्हणतात, की मायकेल एंजेलोची शिल्पे कलेचा उच्चतम आविष्कार जरूर आहेत. परंतु जेव्हा पोस्टकार्ड, कॅलेंडर, पोस्टर सगळीकडे दिसू लागतो तेव्हा त्याचे रूपांतर "कीच (kitsch) आर्ट' होते. यापासून नक्की सावध असले पाहिजे. "पाहण्याची' कला या सर्वांपासून दूर आहे. तिची साथ सोडता कामा नये. या पुस्तकात एके ठिकाणी त्याने आणखी एक झेन वचन दिले आहे.
स्वर्ग जर कुठे असलाच तर तुमच्यात हृदयात आहे
तुम्हाला तो सापडावा मात्र लागेल
तेवढा एकच मार्ग आहे त्यात (त्या स्वर्गात) प्रवेश करण्याचा...
अनुभव हा घेणाऱ्यावर असतो, हे यापेक्षा अधिक सुंदररीत्या कसे सांगता येईल? कला आणि माणूस यांच्यातील संबंधाबाबत विज्ञान स्वर्ग आणि हृदय या ऐवजी मेंदू आणि संवेदनांच्या भाषेत बोलते. विज्ञानाच्या आणि कला-विचारवंतांच्या नजरेतून जाणून घेऊया आपला कला-वारसा. पुढच्या लेखात.. 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: