Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 

कट्टा
(प्रतिनिधी)
Monday, May 15, 2017 AT 12:00 AM (IST)


 
 
   Id: PNE17-P57884  (कट्टा)
Has Photo : No Priority : High  CC 91.7Words 1327
कट्टा
------
कलंदर
-------------
जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन ? की गळचेपी ?
----------------------------------------
तीन मे रोजी जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.
जगभर साजरा होतो.
भारत त्याला अपवाद कसा असेल ?
पण भारतात सध्याच्या राजवटीत हा दिवस "गळचेपी दिवस' साजरा झाला असे म्हणावे लागेल.
दिल्लीस्थित स्वीडनच्या वकिलातीने या दिवसानिमित्त एक परिसंवाद आयोजित केला होता. त्याचा विषय मीडियाशी संबंधित म्हणजे मीडियामधील महिलांच्या वाढत्या सहभागाबद्दल होता.
महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी, टीव्ही पत्रकार बरखा दत्त आणि अलीकडे गाजलेल्या "आय ऍम ट्रोल' पुस्तकाच्या लेखिका स्वाती चतुर्वेदी यांना यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. स्वाती चतुर्वेदी या एकेकाळी भाजपच्या सोशल मीडिया सेलशी निगडित होत्या व तेथे त्यांना जे काही "अनुभव' आले ते त्यांनी त्यांच्यावर पुस्तक लिहिले आणि साहजिकच मग त्या भाजप व संघपरिवाराच्या "हिटलिस्ट' वर गेल्या. बरखा दत्त आधीपासूनच आहेत.
तर या परिसंवादाची निमंत्रणे जाताच स्वीडनच्या दूतावासाला अचानक धमक्‍या मिळू लागल्या.
परिसंवादात बरखा दत्त आणि स्वाती चतुर्वेदी यांचा समावेश का केला म्हणून या धमक्‍या होत्या आणि जर या दोघींना यातून वगळले नाही तर स्वीडनहून भारतात आयात केल्या जाणाऱ्या वस्तुंचा - मालाचा बहिष्कार केला जाईल अशी धमकी देण्यात आली.
या एका निरुपद्रवी कार्यक्रमामुळे एवढा गदारोळ होणार असेल तर कार्यक्रमच कशाला करा ?
बिचाऱ्या स्वीडिश दूतावासाने हा कार्यक्रमच रद्द करून टाकला.
म्हणजेच भारतात आता पत्रकारांचे आणि नागरिकांचे स्वातंत्र्य देखील किती उरले आहे याचा अंदाज यावा !
हे प्रकार कधीपासून वाढले आहेत हे सांगण्याची गरज नाही.
2014 नंतर हे प्रकार वाढत चालले आहे.
नागरिकांना कपडे कोणते घालावेत ? विशेषतः महिलांनी आणि तरुण मुलींना वस्त्र व पेहरावाबाबत विशेष दक्षता घेण्यास सांगितले जात असते. एवढेच नव्हे तर उत्तर प्रदेशात आता मुलामुलींना एकमेकांशी बोलणे. गप्पा मारणे, बरोबर फिरणे याला जवळपास बंदी करण्यात आली आहे. या प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी "अँटि रोमिए स्क्वाड' स्थापन करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रेम वगैरे करण्याच्या गोष्टी फारच दूर !
एवढेच काय कोणी काय खावे यावर तर नियंत्रणे आणलेलीच आहेत. मांसाहाराऐवजी सर्वांना शाकाहारी करण्यासाठी मोदी राजवटीने विडा उचललेला आहे.
तर अशा या गळचेपीच्या आणि गुदमरलेल्या वातावरणात सध्या देश आणि समाज रहात आहे.
भारत महान !!
----------------------------------------------------------------
"आप' इतने परेशान क्‍यूं है ??
------------------------------
"आम आदमी पार्टी' ऊर्फ "आप'वरच्या संकटांची मालिका संपणे दूर, रोजच्या रोज त्यात भर पडताना दिसू लागली आहे.
कुमार विश्‍वास यांचे बंड शमल्यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंत्रिमंडळ फेरबदल केला विश्‍वास यांच्या विश्‍वासू कपिल मिश्र यांना डच्चू दिल्यावर त्यांनी थेट केजरीवाल यांना सत्येंद्र जैननी दोन कोटी रुपये देताना पाहिल्याचा सनसनाटी आरोप केला.
कपिल मिश्र यांना भाजप मदत करीत असल्याचा आरोप केला जात आहे.
कपिल मिश्र हे कुमार विश्‍वास यांचे निकटवर्ती मानले जातात आणि "एमसीडी' निवडणुकीतल्या पराभवानंतर कुमार विश्‍वास यांनी जे बंडाचे निशाण फडकाविले त्यामागे त्यांची भाजपशी असलेली जवळीक हे कारण होते असा सरळसरळ आरोप "आप'मधून निलंबित करण्यात आलेले अमानुल्ला खान यांनी केला आहे.
भाजपचे कोण ?? यावरून "आप'मध्ये जे "तू मी तू मी' चालू आहे त्या "आप'ची कूळकथा तरी काय आहे ?
दिल्लीत "आप'चा उदय झाला तो अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून.
हे आंदोलन पूर्णपणे रा.स्व.संघाने चालवले हे आता जगजाहीर झालेले आहे.
या आंदोलनाला बाटलीबंद पाणी आणि कार्यकर्त्यांना सुग्रास अन्न पुरवठा करणारे हात कुणाचे होते हेही आता समोर आलेले आहे.
त्याचा पर्दाफाश स्वामी अग्निवेश यांनी तेव्हाच केला होता.
बहुधा त्यामुळेच अण्णा हजारे यांना लोकपालची आठवण आता होत नसावी !
तर आता अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सहकारी व उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे संघाच्या निमंत्रणावरून संघ-संचालित विवेकानंद इंटरनॅशनल फौंडोशन या थिकटॅंकमधील लोकांबरोबर कसे भोजनाला गेले होते आणि तेथे त्यांनी एकत्र भोजन कसे केले याचे फोटो आता काही मंडळींनी प्रचलनात आणले आहेत.
कॉंग्रेस पक्षाने "आप' म्हणजे भाजप-संघ परिवाराची "बी टीम' असल्याचा नेहमीच आरोप केला आहे.
त्याच्या पुष्टीसाठी आता कॉंग्रेसची मंडळी या फोटोंचे संदर्भ देऊ लागले आहेत.
"आप' आणि "भाजप' या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि "आप' डोईजड झाल्याने भाजप आता खुन्नस घेऊन त्यांच्या मागे लागलेला आहे असे कॉंग्रेसचे म्हणणे आहे.
आणखी एक पुरावा - शाझिया इलमी आणि किरण बेदी या अण्णांच्या आंदोलनातील बिनीच्या नेत्या ! त्यांनी तर भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला !
"आप'ची मंडळी मात्र त्यांच्यावरील हा "संघ पुरस्कृत' असल्याचा आरोप हिरिरीने खोडून काढतात. "आम्ही संघाचे असतो तर मोदी आमच्या मागे लागण्याचे कारण काय ? हा त्यांचा प्रश्‍न असतो !
चला, दिल्लीत सध्या तशीही गरमी वाढलेलीच आहे, त्यात राजकारणाची गरमी ! डब्बल गरमी !!!
---------------------------
भूतकाळाचं भूत ?
---------------
कधी कधी स्वतःचाच भूतकाळ भेडसावू लागतो.
आणि या पूर्वेतिहासातील गोष्टी, घटना, प्रसंग असे मागे लागतात की पळताभुई थोडी होते.
टीव्हीवर तुम्ही भाजपची बाजू हिरिरीने मांडणारे एक प्रवक्ते जी.व्ही.एल.नरसिंह राव यांना नेहमीच पहात असाल.
त्यांची ही गोष्ट !
2010 मध्ये या रावसाहेबांनी एक पुस्तक लिहिले होते. पुस्तकाचे नाव होते - डेमॉक्रसी ऍट रिस्क ! कॅन वुई ट्रस्ट आवर इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स ?
रावसाहेबांची थोडी पार्श्‍वभूमी लक्षात घेऊ ! ते एक जनमत संग्रहाची संस्था चालवीत होते. (आता चालवतात की नाही माहिती नाही) त्या कनेक्‍शनमधून ते भाजपचे प्रवक्ते झाले.
तर 2009 मध्ये भाजपला जो दारुण पराभव स्वीकारावा लागला आणि आश्‍चर्यकारकपणे कॉंग्रेसला 206 जागा मिळाल्या होत्या. भाजपला तर तो प्रचंड धक्का होता. त्यावेळी रावसाहेबांना इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स ऊर्फ "इव्हीएम्स'बद्दल शंका आलेली होती.
आता अशीच शंका कॉंग्रेससह सर्व विरोधी पक्ष घेत आहेत आणि रावसाहेब भाजपतर्फे ही यंत्रे किती विश्‍वासार्ह आहेत असे सर्टिफिकेट देत वृत्तवाहिन्यांवर आपले तोंड वाजवीत आहेत.
काय म्हणावं याला, काळानं उगवलेला सूड ?
असे सांगतात की या पुस्तकाच्या तीनशे प्रतींची आवृत्ती छापण्यात आलेली होती. रावसाहेबांनी त्यातल्या 200 प्रती नुसत्या सप्रेम भेटीदाखल वाटल्या होत्या.
आता जे विरोधी पक्ष उत्तर प्रदेशातल्या भाजपच्या विजयाबद्दल शंका घेत आहेत ते पक्ष या पुस्तकाच्या प्रती मिळविण्याच्या मागे लागले असल्याचे समजते.
यामध्ये बहुजन समाज पक्ष, "आप' आणि कॉंग्रेस पक्षाचे लोक आघाडीवर आहेत. काही लोकांनी तर थेट रावसाहेबांकडेच धडक मारली पण त्यांनी एकही प्रत शिल्लक नसल्याचे सांगून उडवून लावले.
आता काही मंडळींनी एक "ऑनलाइन' प्रत मिळवली आहे आणि लवकरच त्याच्या प्रती भाजपच्या विरोधात वापरण्यात येतील असे सांगण्यात येते. काय मजाच मजा ! एखादा खजिना धुंडाळण्यासाठी एखादी टोळी धावपळ करीत असावी तसाच हा प्रकार आहे नाही का ?
जय हो !!!
---------------------------------------------------------
"खंड्या पक्षी' भुर्रच ?
--------------------
खंड्या पक्ष्याला इंग्रजीत काय म्हणतात ?
"किंगफिशर !'
"किंगफिशर' कंपनी कुणाची ? किंगफिशर एअरलाइन्स, किंगफिशर मद्यप्रकार वगैरे वगैरे !
या कंपनीचे मालक सध्या इंग्लंडमध्ये, लंडनमध्ये आहेत.
त्यांना भारताच्या ताब्यात देण्याची भारताची मागणी असली तरी सध्या हे प्रकरण इंग्लंडमधील न्यायालयाच्या अधिकारात आहे आणि तेथील न्यायालयीन प्रक्रियेनंतरच याबाबतचा निर्णय होईल.
गेल्याच आठवड्यात ब्रिटनच्या गृहमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ भारतात आले होते.
भारताचे गृहसचिव राजीव महर्षी यांच्याबरोबर त्यांच्या वाटाघाटी झाल्या.
यामध्ये भारतात गुन्हे करून ब्रिटनमध्ये आश्रय घेतलेल्यांना भारताच्या ताब्यात घेण्यासंबंधीच्या कराराबाबत (एक्‍स्ट्रॅडिशन ट्रीटी) विस्ताराने चर्चा झाली परंतु "खंड्या पक्षा'चा काही उल्लेखही झाला नव्हता.
असे सांगतात की ही चर्चा सुरू होण्यापूर्वीच "इंग्रज साहेबांनी' (खरं तर "साहेबिणी' कारण इंग्रज नेतृत्व पॅट्‌सी विल्किन्सन या महिला अधिकाऱ्याकडे होते) भारतीय बाजूला बजावले की "हा खंड्या पक्षाचा विषय' जास्त काढायचा नाही कारण ब्रिटनमध्ये न्यायालये कडक आहेत आणि सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि जोपर्यंत न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत याबाबत जाहीर उच्चार करता येणार नाही !
झालं ! भारतीयांचा बोलतीच बंद !
एक मिळमिळीत निवेदन काढून ही भेट समाप्त झाली.
व्वा रे खंड्या पक्षी ! इकडे भारत सरकार मारे फुशारक्‍या मारत सुटले आणि साहेबाने तर उत्साहावरच पाणी ओतले ??
-----------------------------
एर्दोगान अचानक उठून निघतात तेव्हा !
राजशिष्टाचार किंवा प्रोटोकॉल हा एक अत्यंत रंजक पण कधीकधी गंभीर व अनावस्था प्रसंग उत्पन्न करणारा विषय आहे.
तुर्कस्तानचे अध्यक्ष रिकिप एर्दोगान यांना नुकतीच भारताला भेट दिली.
त्यांच्यासाठी राष्ट्रपतिभवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यातर्फे मेजवानीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जेव्हा अन्य देशाचे अध्यक्ष भेट देतात तेव्हा राष्ट्रपतींतर्फे मेजवानी किंवा "शाही रात्रिभोजनाचा' कार्यक्रम आयोजित करण्याचा राजशिष्टाचार असतो.
त्यानुसार एर्दोगान यांच्या हा मेजवानीचा कार्यक्रम सुरू झाला.
सुरवातीची औपचारिकता संपल्यानंतर अतिविशिष्ट मंडळी प्रत्यक्ष भोजनासाठी टेबलांवर स्थानापन्न झाली.
अचानक एर्दोगान यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये काहीशी चलबिचल आणि संभाषण सुरू झाल्याचे नजरेस आले.
सर्वसाधारणपणे अशा कार्यक्रमात अध्यक्षांचे शरीररक्षक व अन्य सुरक्षा कर्मचारी हे काही अंतरावर स्तब्ध उभे असतात.
पण ही चलबिचल वाढत गेली कारण एक सुरक्षा कर्मचारी येऊन एर्दोगान यांच्या कानात येऊन काही कुजबूज लागला.
एर्दोगान हे टेबलावरील अन्य पाहुण्यांची परवानगी घेऊन त्यांच्याबरोबर बाहेर पडले.
उपस्थितांना कळेना की नक्की झाले काय ?
तुर्कस्तानात सध्या अस्थिरता आणि अशांतता आहे. तेथे तर काही अचानक गडबड, आणीबाणीची परिस्थिती किंवा संकट तर उद्‌भवले नाही ?
एक नाही नाना शंका येऊ लागल्या.
काही मिनिटांनी एर्दोगान परतले, शांतपणे टेबलावर बसले.
आधीपेक्षा त्यांचा चेहरा काहीसा शांत दिसत होता.
त्यांनीच मग फारसा "सस्पेन्स' न ठेवता त्यांना मघापासून स्वच्छतागृहात जायचे होते आणि संधी मिळत नव्हती. ती आता मिळाली.
ते ऐकल्यावर त्या टेबलावरील सर्वच अतिविशिष्ट मंडळींच्या मनावरील व चेहऱ्यावरील ताण हलका झाला.
हास्य करीत मंडळींनी भोजनाचा आस्वाद घेण्यास सुरवात केली !
-------------------------------------


 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: