Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 

पुस्तकांच्या गावात स्वागत...
प्राजक्ता ढेकळे
Monday, May 15, 2017 AT 12:00 AM (IST)


पुस्तकांच्या गावात स्वागत...

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या पुस्तकांचं गाव भिलारचा उद्‌घाटन सोहला नुकताच (ता.4 मे 2017)ला पार पडला. या उद्‌घाटन समारंभाच्या निमित्ताने साहित्यप्रेमी, पर्यटक, आणि आजूबाजूच्या गावीतील लोक व भिलारचे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले

त्या दिवशी पाचगणी घाटाच्या सुरवातीपासूनच ठिकठिकाणी "पुस्तकांचं गाव भिलार' असे फलक ठराविक अंतराने पाहायला मिळत होते. वाई ते पाचगणीचा प्रवास संपवून, भिलार गावात प्रवेश करताच सुरवातीपासूनच वेगळेपण जाणवत होते. गावात जाणाऱ्या रस्त्यांच्या बाजूने रांगोळ्यांच्या पायघड्या घातलेल्या होत्या. बालसाहित्य, कादंबरी, इतिहास, स्त्री-साहित्य असे विविध फलक दिसत होते. आज दैनंदिन कामाची गडबड बाजूला सारून गावातील प्रत्येक व्यक्‍ती अत्यंत उत्साहाने, आनंदाने "पुस्तकांचं गावा'च्या उद्‌घाटनाच्या सोहळ्याची तयारी करत होती.

खरे तर ही तयारी खूप आधीपासूनच सुरू झाली होती. आज केवळ औपचारिकपणा होता. आतापर्यंत स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असणारे भिलार गाव आजपासून (ता. 4 मे 2017) भारतातील पहिले "पुस्तकांचं गाव' म्हणून ओळखले जाणार आहे. गावातील वातावरण उत्साही होते, येणाऱ्या प्रत्येक पुस्तकप्रेमी, साहित्यकाचे आदराने स्वागत करण्यात येत होते. गावातील निवडक घरांच्या रंगवलेल्या आकर्षक भिंती, प्रत्येक घरासमोर काढलेली रांगोळी... चढउतारावर वसलेल्या या गावातील प्रत्येक वळणावर छोट्या-छोट्या समूहाने लोक उभे होते. येणाऱ्या प्रत्येकाला कुठे, कसे जायचे हे सांगत होते. प्रकल्पासाठी निवडलेल्या प्रत्येक घरासमोर एक टेबल, चार-पाच खुर्च्या मांडून ठेवलेल्या होत्या. प्रत्येक घरी, मंदिरात, शाळांमधील रॅक व कपाटामध्ये पुस्तके व्यवस्थित लागली आहेत ना? पुस्तके बघायला येणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रियेसाठी ठेवलेल्या "फीडबॅक नोटबुक' जागेवर आहेत ना? येणाऱ्या लोकांना व्यवस्थित माहिती दिली जात आहे ना? याकडे लक्ष दिले जात होते. आज गावात गावकऱ्यांबरोबर साहित्यिक मंडळी, आजूबाजूच्या गावचे ग्रामस्थ, साहित्यप्रेमी यांचीही वर्दळ पाहायला मिळत होती. बाहेरगावाहून आलेले साहित्यिक, पर्यटक आवर्जून पुस्तके ठेवलेल्या घरांमध्ये जात होते. पुस्तके हाताळत होते. पुस्तके बघायला येणाऱ्या लोकांना त्या त्या घरांतील ग्रामस्थ पुस्तकांची माहिती देत त्यांचे स्वागत करत होते.

भारतातील "पहिलं पुस्तकांचं गाव' म्हणून पाचगणीमधील भिलार गावाची निवड झाली आणि स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असणारे हे गाव पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आले. निसर्गाचा वरदहस्त लाभलेले हे गाव, आपला हा उपक्रम राबविण्यासाठी अगदी सुरवातीपासूनच प्रयत्नशील आणि उत्साही होते. गावातील घरांची, मंदिरांची, शाळांची निवड करताना प्रत्येक गोष्ट अचूक पद्धतीने कशी होईल याकडे लक्ष देत होते. भिलारमधील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या नावावर असलेली तीन एकर जमीन या उपक्रमासाठी शासनाला दिली आहे. आपल्या गावात वाचनसंस्कृती रुजावी यासाठी लोकांनी निःसंकोचपणे घरात वाचनालय करण्यास परवानगी दिली. मराठी भाषा विभागाकडून येणाऱ्या प्रत्येक सूचनांचे पालन भिलार ग्रामस्थांनी केले आहे. उपक्रमाच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत होते. एकूणच थंडगार वातावरणात, निसर्गाच्या सान्निध्यात, पक्ष्यांच्या किलबिलाटात वाचनप्रेमींना साहित्याचा सहवास या गावात घडून येणार आहे.

चौकट
ज्येष्ठ लेखिका, कवयित्री अरूणा ढेरे
"पुस्तकांचे गाव' हा उपक्रम खरोखर खूप अभिनव आहे. महाराष्ट्र शासन पुढाकार घेऊन हा उपक्रम राबवत असताना, या उपक्रमाला गावकऱ्यांनी दिलेला उत्स्फूर्त सहभागदेखील खूप महत्त्वाचा आहे. आता हा उपक्रम पुढे चालू ठेवण्याची मुख्य जबाबदारी साहित्यिक आणि वाचक दोघांची आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने लेखकांनी या ठिकाणी येऊन ग्रामस्थ, पर्यटक, तरुणमंडळींच्याबरोबर वेळ घालवावा. त्यामुळे वाचकांना लेखकांची ओळख होण्यास मदत होईल. याबरोबर निसर्गाच्या सान्निध्यात बसून लेखन करण्यासही वाव मिळेल.

पुस्तकांच्या गावाला भेटदेण्यासाठी विविध स्तरातील लोक भिलार गावामध्ये आले होते. सकाळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत हिलरेंज हायस्कूलचे विद्यार्थी व भिलारच्या ग्रामस्थांनी ढोल-ताशांच्या गजरात गावातून "ग्रंथदिंडी' काढली होती.

लेखक, अभिनेते अभिराम भडकमकर
वाचन संस्कृती रुजवण्यासाठी "पुस्तकांचं गाव' ही अत्यंत महत्त्वाची चळवळ आहे. पुस्तके ही जीवनाच्या सर्व अंगांनी जोडली गेली पाहिजेत. पर्यटनाला पुस्तकांची जोड देणे महत्त्वाचे आहे. यापुढे प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावात ही संकल्पना राबवली पाहिजे, अशी अनेक पुस्तकांची गावे तयार झाली पाहिजेत. पुस्तकांमुळे वैचारिक समृद्धी येते. यामुळे परिपक्वतेची पातळी वाढेल अशी आशा आहे.

मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, लेखक, अभ्यासक डॉ. सदानंद मोरे
हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. आजचे युग हे ज्ञानचे युग आहे. ज्ञानाधिष्ठित समाजनिर्मितीचे कार्य यांसारख्या उपक्रमांमधून होत आहे. त्यातही महाराष्ट्र शासन याप्रकारचे उपक्रम राबवत आहे, ही अजूनच चांगली गोष्ट आहे.

उद्‌घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "भिलार हे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध होणार आहे. या उपक्रमासाठी भिलार ग्रामस्थांनी केलेले सहकार्य कौतुस्कापद आहे. खरे तर मराठी माणसाला पहिल्यापासूनच पुस्तकांचे आकर्षण आहे. साहित्य, नाटक, सिनेमा, संगीत याचे आकर्षण मराठी मनाला कायम राहिले आहे. विविध प्रकारचे साहित्य मराठी भाषेत सापडते. असे साहित्य जगातील इतर भाषांमध्ये सापडेल असे मला वाटत नाही. वाचन संस्कृतीला अत्यंत मनापासून मराठी माणसाने स्वीकारले आहे. वाचनातून निखळ आनंद मिळत असतो. मग तुम्ही कोणत्याही प्रकारचे साहित्य वाचा. ज्या - त्या काळातील समाजाच्या परिस्थितीचे प्रतिबिंब त्या-त्या साहित्यातून उमटत असते. त्यातून आपल्या जाणीवेच्या कक्षा रूंदावत असतात. समाजामध्ये येणारी प्रगल्भता ही सर्व प्रकारच्या वाचनामुळे येत असते. गेल्या काही वर्षांत छपाई यंत्राच्या क्षेत्रात मोठी क्रांती झाली. वेगवेगळ्या राज्यक्रांतीमध्ये लेखक आणि पुस्तकांचे योगदान मोठे आहे. स्वातंत्रपूर्व काळात पुस्तके आणि वर्तमानपत्रे यांनी लोकांमध्ये स्फुल्लिंगे पेटवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पुस्तके आणि वर्तमानपत्रे शब्दांतून आग ओकत होती. त्यांच्यामुळे मोठी क्रांती झाली आणि देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी मदत झाली. ही संस्कृती आपण जपून ठेवली, तरच ती पुढील पिढीला देऊ शकू. मराठी माणूस हा ज्ञानपिपासू असल्याने माध्यमांत कितीही बदल झाले, कितीही डिजिटलायझेशन झाले, तरी वाचन व मराठी भाषेचे महत्त्व कधीही कमी होणार नाही. "पुस्तकाचे गाव' म्हणून इतिहासात नोंद झालेले भिलार गाव साहित्यिक व प्रकाशकांचे डेस्टिनेशन म्हणून उदयाला येईल. तसेच, वाचनासाठी शांतता आवश्‍यक आहे. तो आनंद निसर्गाच्या सान्निध्यात मिळवून देण्यासाठी आम्ही भिलारची निवड केली. याठिकाणी येणारा पर्यटक शांतपणे वाचनाचा आनंद घेईल आणि पुस्तकांच्या गावी आलोच आहोत, तर महाबळेश्‍वरला जाऊ असाही विचार करेल.'

पुस्तकांचे गाव ही संकल्पना ज्यांनी सुचवली आणि प्रत्यक्षात आणली ते उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले, "काही वर्षांपूर्वी कुटुंबासमवेत इंग्लंडला गेलो होतो. तेथील "हे ऑन वे' हे पुस्तकांचे गाव त्यावेळी पाहिले. त्यातून ही संकल्पना सुचली. ते गाव पुस्तक विक्रेत्यांचे आहे. पुढे 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्रात पुस्तकाचे गाव उभारण्याचा संकल्प सोडला. तो आज पूर्ण होत आहे. विकासाचा बॅकलॉग, विभाग, गटतट यात न अडकता स्वाभाविक पर्यटक असलेले गाव म्हणून आम्ही भिलारची निवड केली आहे. भिलारमधील ग्रामस्थांनीही याला प्रतिसाद दिला. पहिल्या टप्प्यात आम्ही 15 हजार पुस्तके भिलारला दिली असून, भविष्यात ही संख्या अडीच लाखांपर्यंत नेणार आहोत. पर्यटनाच्या हंगामात भिलारमध्ये साहित्य महोत्सव भरवला जाणार आहे. "बुक कॅपिटल' हा युनोस्कोमार्फत दिला जाणारा किताब "पुस्तकांचे गाव भिलार'ला मिळवून देण्याचा निश्‍चय आम्ही केला आहे.'

उत्साह आणि चैतन्यमय वातावरणात हा उद्‌घाटन सोहळा पार पडत असतानाच, ढगांचा गडगडाट आणि पावसाच्या सरींनी या सोहळ्याला जणू आनंदाची झालर लावली. या सगळ्या आनंदी, उत्साही वातावरणातून भविष्यात पुस्तकांचे गाव साहित्यप्रेमींमध्ये नक्कीच लोकप्रिय ठरेल, असे वाटते.

पुस्तकांविषयी थोडेसे
या गावात बालसाहित्य, कादंबरी, विज्ञान, नियतकालिके व साहित्यिक माहितीफलक, इतिहास, दिवाळी अंक, चरित्रे, आत्मचरित्रे, बोलकी पुस्तके, स्त्री-साहित्य, दिवाळी अंक, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, लोकसाहित्य, ललित गद्य व वैचारिक, भाषा व साहित्यिक खेळ, कथा, संत साहित्य अशी अनेक प्रकारची 15 हजार पुस्तके ठेवण्यात आली आहेत. या प्रकल्पासाठी गावातील 25 घरांमध्ये ग्रंथालये तयार करण्यात आली आहेत. याशिवाय समाज मंदिर, शाळा आणि ग्रामदैवताच्या मंदिर परिसरातही पुस्तके ठेवण्यात आली आहेत.


 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: