Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 

गर्भवती स्त्रियांमधील मधुमेह
डॉ. अविनाश भोंडवे
Monday, May 15, 2017 AT 12:00 AM (IST)
गर्भवती स्त्रियांमधील मधुमेह

मधुमेह ही आपल्या देशाच्या दृष्टीने एक महत्त्वाची आरोग्यविषयक समस्या होऊ पाहते आहे. आजमितीला सात कोटी भारतीय मधुमेहाचे रुग्ण आहेत आणि इ. स. 2025 पर्यंत ही संख्या 8.2 कोटींपर्यंत जाईल असा अंदाज आहे. मधुमेहींच्या या आकाशाला भिडत जाणाऱ्या संख्येमध्ये युवक-युवतींची संख्या जशी मोठ्या प्रमाणात आहे, तशीच गरोदर अवस्थेत होणाऱ्या मधुमेहाने व्याधीग्रस्त झालेल्या महिलांचे प्रमाणही वाढत आहे. आज भारतात गर्भवती स्त्रियांपैकी 12 - 20 टक्के स्त्रियांमध्ये प्रसूतिपूर्व मधुमेह आढळून येतो.
दिवस राहण्याआधी मधुमेह नसलेल्या स्त्रियांना गरोदरपणात होणाऱ्या या मधुमेहाला "जेस्टेशनल डायबेटिस' म्हणतात. म्हणजेच या गर्भवती स्त्रियांना अगोदर मधुमेह नसतो, परंतु गर्भवती अवस्थेत त्यांच्या रक्तातील ग्लुकोज साखरेचे प्रमाण प्रमाणित पातळीपेक्षा जास्त वाढते, अशा स्त्रियांना गरोदरपणातला मधुमेह झाला असे म्हणतात.
कारणमीमांसा - गर्भवती स्त्रीच्या पोटातील गर्भाला त्याच्या नाळेवाटे मातेकडून पोषक द्रव्ये मिळतात, त्यामुळे गर्भाची वाढ होत जाते. यासाठी नाळेतून काही संप्रेरकेदेखील स्रवतात. पण यांपैकी काही संप्रेरके मातेच्या इन्शुलिनच्या कार्यात बाधा आणतात. यालाच इन्शुलिन अवरोध म्हणतात. याच इन्शुलिन अवरोधामुळे त्या स्त्रीच्या शरीरामधील नैसर्गिक इन्शुलिन तिच्या रक्तातील साखरेचे नियंत्रण करण्यास कमी पडते आणि त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढून तिला मधुमेह होतो.
सर्वसाधारणपणे हा मधुमेह गर्भावस्थेत केव्हाही होऊ शकतो; पण सर्वसाधारणपणे बहुसंख्य स्त्रियांत तो चोविसाव्या आठवड्यात झाल्याचे आढळते. कोणत्याही गर्भवती स्त्रीला हा मधुमेह होऊ शकतो, पण काही विशिष्ट गोष्टी असल्यास हा धोका अधिक असतो. उदा.-
स्थूलत्व - ज्यांचे वजन खूप जास्त असते, अशा स्थूल स्त्रियांना, विशेषतः ज्यांचा बी.एम.आय. तीसपेक्षा जास्त आहे अशांना गर्भवती अवस्थेत मधुमेह होण्याची शक्‍यता असते. (बी.एम.आय. = किलोग्रॅममध्ये वजन भागिले मीटरमध्ये उंचीचा वर्ग)
- ज्या स्त्रियांच्या पहिल्या बाळंतपणात जन्मलेल्या बाळाचे वजन 4.5 किलोग्रॅमपेक्षा अधिक असेल
- ज्या स्त्रियांना आधीच्या बाळंतपणात मधुमेहाचे निदान झाले असेल
- ज्या स्त्रियांना मधुमेहाची कौटुंबिक पार्श्‍वभूमी आहे
- ज्या गर्भवती स्त्रियांचे वय तीस वर्षांपेक्षा जास्त असेल
- ज्या स्त्रियांना बाळाच्या प्रसूतिपूर्व तपासणीत केलेल्या सोनोग्राफीमध्ये बाळाची वाढ अपेक्षेपेक्षा जास्त असेल किंवा गर्भजल जास्त असेल
- ज्या स्त्रियांना गरोदरपणात योनीमार्गाचा संसर्ग वारंवार आढळून येत असेल
या गोष्टी प्रसूतिपूर्व तपासणीत लक्षात आल्यावर, त्यांना असलेल्या जेस्टेशनल डायबेटिसच्या शक्‍यतेसाठी विशेष काळजी घेऊन त्यांच्या रक्तातील साखरेच्या वरचेवर तपासण्या कराव्या लागतात.

लक्षणे - तसे वरवर पाहता, या स्त्रियांना काही वेगळी लक्षणे जाणवत नाहीत. क्वचित काही जणींमध्ये वरचेवर तहान लागणे, सतत लघवी होणे, तोंडाला कोरड पडणे, जेवणापूर्वी कमालीचा थकवा जाणवणे अशी काही लक्षणे आढळून येतात. पण ही लक्षणे अनेक स्त्रियांमध्ये गरोदरपणात मधुमेह नसतानासुद्धा दिसून येतात. त्यामुळे नियमित तपासण्या केल्या तरच याचे निदान होऊ शकते.

रोगनिदान - प्रत्येक गर्भवती स्त्रीच्या पहिल्या प्राथमिक तपासणीत, वर उल्लेखिलेले धोके आणि कौटुंबिक पार्श्‍वभूमी, पूर्वेतिहास याचा सर्वांगीण विचार केला जातो. सातव्या महिन्यात त्या स्त्रीची "ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट' केली जाते. नॅशनल डायबेटिस डेटा ग्रुप या संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे केल्या जाणाऱ्या तपासणीनुसार, तिला सकाळी पूर्ण उपाशीपोटी 75 ग्रॅम ग्लुकोज देऊन दर अर्ध्या तासाने दोन तासांपर्यंत रक्तातील साखर तपासली जाते. यात तिला गरोदरावस्थेतील मधुमेह झाला आहे किंवा होण्याची शक्‍यता आहे याची पडताळणी होते.
या ऐवजी काही वेळा 50 ग्रॅम साखरेचे पाणी देऊन एका तासाने साखर तपासतात आणि ती 140 च्या वर आली तर मधुमेह आहे, असे समजतात. काही चाचण्यांमध्ये ही साखर 136 च्या वर नसावी असेही म्हटले आहे. आजकाल याऐवजी बऱ्याचदा एचबीए-1 सी ही तपासणी केली जाते.
नुकतीच जीसीडी 59 नावाची एक नवी तपासणी शोधली गेली आहे. त्यामध्ये 24 - 28 व्या आठवड्यात गर्भवती स्त्रीला मधुमेह होईल किंवा नाही याचे बिनचूक निदान होऊ शकते, असे सांगितले गेले आहे.

प्रसूतीमधील धोके - जेस्टेशनल डायबेटिस असलेल्या स्त्रियांच्या प्रसूतीमध्ये काही गंभीर धोके उद्‌भवू शकतात.
- गरोदरपणातला मधुमेह झालेल्या स्त्रियांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने ती साखर नाळेमधून बाळाच्याही रक्तात जाते, मात्र त्यासोबत तिच्या शरीरातील इन्शुलिन मात्र जाऊ शकत नाही. त्यामुळे बाळाच्या शरीरातील स्वादुपिंड अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी अधिकाधिक इन्शुलिन निर्माण करू लागते. अशा रीतीने बाळाच्या पेशींमध्ये वाढीसाठी आवश्‍यक असलेल्या ऊर्जेपेक्षा अधिक ऊर्जा साखरेच्या रूपाने मिळाल्यामुळे ते लठ्ठ होण्याचा धोका संभवतो. परिणामी अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात.
- जन्माच्या वेळी खांद्यांना दुखापत होण्याची शक्‍यता आणि श्‍वासोच्छवास करण्यास त्रास
- जन्मानंतर बाळ लठ्ठ असू शकते आणि त्याला प्रौढपणी मधुमेह होण्याची शक्‍यता असते
- या स्त्रियांचे बाळ आकाराने आणि वजनाने खूप जास्त असल्यामुळे त्यांच्या प्रसूतीला अडथळा येऊ शकतो. त्यामुळे या स्त्रियांची प्रसूती नॉर्मल न होता त्यांना सिझेरियन लागू शकते
- या स्त्रियांच्या गर्भाशयात गर्भजल जास्त प्रमाणात निर्माण होते. त्यामुळे या स्त्रियांची प्रसूती दिवस पूर्ण भरण्याआधी अपुऱ्या दिवसात होऊ शकते. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या बाळाला धोका निर्माण होऊ शकतो
- या स्त्रियांचे बाळंतपण अपुऱ्या दिवसात म्हणजे 37 व्या आठवड्यात उद्‌भवू शकते.
- गर्भावस्थेच्या शेवटच्या दिवसात, या स्त्रियांना "प्रीक्‍लॅम्पशिया' हा त्रास होऊ शकतो. यामध्ये त्या स्त्रीचा रक्तदाब खूप वाढतो, लघवीतून मोठ्या प्रमाणात प्रथिने जाऊ लागतात. त्यांच्या लाल रक्तपेशी, प्लेटलेट्‌स कमी होतात, त्यांच्या यकृताची आणि मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होते. त्यांच्या सर्वांगावर सूज येते, त्यांची दृष्टी क्षीण होते, दम लागतो आणि त्यांना अपस्मारासारखे झटके येऊ शकतात. या विकारात माता आणि बालक दोघांच्याही जिवाला गंभीर धोका उद्‌भवू शकतो.
- मातेला गर्भावस्थेत मधुमेह असेल तर तिच्या बाळाला जन्मजात गंभीर स्वरूपाची कावीळ होण्याची शक्‍यता असते. बाळाचे स्वादुपिंड अतिरिक्त इन्शुलिन तयार करीत असल्यामुळे जन्माच्या वेळी रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे बालकाच्या जिवाला धोका असल्याने जन्मतः नवजात अर्भकांच्या अतिदक्षता विभागात ठेवण्याची गरज भासते.
- प्रसूतीत क्वचितप्रसंगी मृत बालक जन्मण्याची शक्‍यता असते.
- प्रसूतीनंतर त्या स्त्रियांना कायमस्वरूपी मधुमेह होऊ शकतो.

उपचार आणि काळजी
प्रसूतिपूर्व तपासणीत गर्भवती स्त्रीला जर मधुमेह असेल, तर तिचे बाळंतपण हे "हाय रिस्क प्रेग्नन्सी' किंवा जोखमीची प्रसूती मानली जाते. साहजिकच जिथे नवजात अर्भकांचा अतिदक्षता विभाग आहे अशा सुसज्ज रुग्णालयातच तिची प्रसूती करावी लागते. प्रसूतीतज्ज्ञांबरोबरच मधुमेह विशेषज्ञांचा सल्ला आणि उपचार, बाळंतपण होईपर्यंत आणि त्यानंतर किमान सहा महिने चालू ठेवावे. गरोदर अवस्थेतील पहिल्या तीन महिन्यांत पोटातील बाळाची सोनोग्राफी करून बाळाची वाढ, गर्भजल, बाळाच्या शरीरातील व्यंग, हृदयाची परिस्थिती या सर्व गोष्टी करून घ्याव्यात आणि त्यापुढेही वैद्यकीय सल्ल्याने त्या करत राहाव्यात.
इतर मधुमेही रुग्णांप्रमाणेच प्रसूतिपूर्व मधुमेह हादेखील योग्य आहार, थोडाबहुत व्यायाम आणि आवश्‍यक औषधांनी नियंत्रित होतो. त्यामुळे या तिन्ही गोष्टींमध्ये वैद्यकीय सल्ल्यानेच वागावे.

आहार - आहारात नेहमीपेक्षा 250 ते 300 कॅलरीज अधिक असाव्यात. या अतिरिक्त आहारात 15 ग्रॅम प्रथिने, 500 मि.ग्रॅ. कॅल्शिअम, 500 मायक्रोग्रॅम फोलिक ऍसिड, आणि ब जीवनसत्त्व नेहमीपेक्षा अधिक असावेत. या महिलांनी इतर गर्भवती स्त्रियांप्रमाणे डिंक लाडू, सुका मेवा असे पदार्थ खाऊ नयेत.

व्यायाम - पहिल्या तीन महिन्यांत मर्यादित चालण्याचे व्यायाम करावेत. त्यानंतर सोसवेल तितके थोडे थोडे चालणे, घरातील नित्य कामे करत राहावे.

औषधे - मधुमेह विशेषज्ञांना नियमित भेटून आवश्‍यक त्या तपासण्या नियमाने कराव्यात आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे औषधे आणि सांगितलेल्या मात्रेमध्ये इन्शुलिन घ्यावे.

गर्भवती अवस्थेतील मधुमेही स्त्रीची प्रसूती सुखरूप व्हावी आणि तिला, तसेच तिच्या बाळाला विशेष त्रास होऊ नये याकरिता गर्भवती स्त्री आणि तिच्या कुटुंबीयांचे संपूर्ण सहकार्य आवश्‍यक असते. हा सर्व उपचार पूर्णपणे शास्त्रीय तत्त्वांनी करावा लागतो. प्रसूतितज्ज्ञ, मधुमेह विशेषज्ञ, परिचारिका, आहारतज्ज्ञ आणि नातेवाईक यांनी एकत्रितपणे काम करावे लागते.
गर्भवती अवस्थेतील मधुमेहाचे उपचार करताना अनेकदा त्या स्त्रीच्या रक्तातील साखर कमी होऊन गरगरणे, चक्कर येणे असे त्रास होऊ शकतात. असा त्रास झाल्यास 2 - 3 चमचे ग्लुकोज किंवा साधी साखर खावी. असे होऊ नये म्हणून दर 3 - 4 तासांनी थोडा थोडा आहार घेत राहावा.
या स्त्रियांनी आपल्या उपचाराद्वारे रक्तातील साखर उपाशीपोटी किंवा जेवणाआधी 95 जेवणांनंतर 1 तासाने 140 मिलिग्रॅम किंवा त्यापेक्षा थोडी कमी आणि जेवणानंतर 2 तासांनी 120 मिलिग्रॅम या प्रमाणात ठेवणे गरजेचे असते. एचबीए1सीचे प्रमाण 6.4 पेक्षा कमी असल्यास उत्तम असते.
बाळंतपणानंतर साधारणतः दीड ते दोन महिन्यांत रक्तातील साखरेची पातळी सर्वसाधारण येऊ लागते. त्यानंतर मधुमेहाची औषधे डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार थांबवावी. पण रक्ताची तपासणी त्यापुढेही चालू ठेवावी. कारण काही रुग्णांमध्ये प्रसूतिपश्‍चातसुद्धा मधुमेह कायम राहतो.
विशेष म्हणजे, या काळात ज्या स्त्रियांचा मधुमेह बरा होतो, त्यांच्यापैकी निम्म्या स्त्रियांना त्यापुढे 12 - 15 वर्षांनी कायमचा मधुमेह उद्‌भवतो.
दिवस राहण्याच्या आधीपासून ज्यांना मधुमेह आहे, अशा स्त्रियांनी गर्भधारणेचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा. हा निर्णय घेण्याआधी किमान 6 महिने आधीपासून मधुमेह आणि वजन पूर्ण आटोक्‍यात असायला हवे. या स्त्रियांना गर्भधारणा झाल्यास त्यांचा मधुमेह, "प्रीजेस्टेशनल डायबेटिस' किंवा प्रसूतीपूर्वकालीन मधुमेह म्हणून गणला जातो. या स्त्रियांनासुद्धा खूप काळजी घ्यावी लागते. त्यानंतर साधारण गर्भावस्थेचे 8 आठवडे झाल्यावर मधुमेह विशेषज्ञांच्या सल्ल्याने गोळ्या बदलून इन्सुलिनद्वारे साखर नियंत्रणात ठेवावी. कॅल्शिअम, ब जीवनसत्त्व, लोह, फोलिक ऍसिडच्या गोळ्या दिवस राहिल्यावर, पहिल्या तीन महिन्यांतच प्रसूतीतज्ज्ञांच्या सल्ल्याने सुरू कराव्यात. या स्त्रियांना अकल्पित आणि अनियोजित गर्भधारणा झाल्यास त्यांनी मधुमेह विशेषज्ञांचा सल्ला घ्यावा.
प्रसूतिपूर्व काळातील मधुमेहाचे वाढते प्रमाण आणि त्याचे बाळावर आणि आईच्या आरोग्यावर दुष्परिणाम पाहता, या आजाराबद्दल सर्व स्तरात राष्ट्रीय पातळीवर जनजागृती होणे नितांत आवश्‍यक आहे. प्रसूतिपूर्व तपासणीत सरकारी, निमसरकारी आणि खासगी रुग्णालयात प्रत्येक गर्भवती स्त्रीची या आजारासाठी काटेकोर तपासणी व्हायला हवी. 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: